मेस्सीच्या अर्जेंटीनाला काटेकीटक्कर देणारा २३ वर्षाचा किलियन एम्बाप्पे आहे तरी कोण? जाणून घ्या विश्वचषकातील त्याचे पराक्रम

एमबाप्पे सध्या जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. तो इतक्या वेगाने चेंडूवर झेपावतो की जगभरातील बचावपटूंना त्याला रोखणे कठीण होते. कायलियन एमबाप्पे जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये गणले जाते. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये त्याने सर्वाधिक दहा गोल करून यंदाच्या विश्वचषकातील 'गोल्डन बूट' पुरस्कार पटकावला आहे. यात त्याने सात गोल केलेल्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.

  मुंबई : सध्या कतार येथे संपन्न झालेल्या फिफा विश्वचषक २०२२ ची जगभरात चर्चा सुरु आहे. मेस्सीचा अर्जेंटिना संघ आणि २०१८ चा विश्वविजेता झालेला फ्रान्स संघ यांच्यात रविवारी झालेल्या रोमहर्षक सामन्यात अर्जेंटिना संघाचा विजय झाला. अर्जेंटिनाने पेनल्टी शूटआऊटमध्ये फ्रान्सवर ४-२ ने विजय मिळवला आणि फ्रान्सला लागोपाठ दुसऱ्यांदा विश्वविजेता होण्यापासून रोखले. या रोमांचक मुकाबल्या दरम्यान मेस्सीच्या अर्जेंटीनाला काटेकीटक्कर देणाऱ्या अवघ्या २३ वर्षीय किलियन एम्बाप्पे या फुटबॉलपटूची बरीच चर्चा झाली. किलियन एम्बाप्पेचा खेळातील ग्राफ पाहून त्याची तुलना जगप्रसिद्ध फुटबॉल खेळाडू लिओनेल मेस्सी सोबत केली जात आहे. तेव्हा हा तरुण फुटबॉलपटू नक्की कोण आहे आणि त्याची इतकी चर्चा का होतेय हे आपण जाणून घेऊयात…

  किलियन एमबाप्पे या अवघ्या २३ वर्षांच्या फ्रेंच फुटबॉलपटूने खूपच कमी कालावधीत अविश्वसनीय ट्रॅक रेकॉर्ड बनवला आहे. एक खेळाडू म्हणून एमबाप्पेने अनेक पुरस्कार आणि विजेतेपद पटकावले असून तो सध्या PSG क्लबकडून खेळतो आहे. या क्लबमध्ये ब्राझीलचा नेमार ज्युनियर आणि अर्जेंटिनाचा लिओनेन मेस्सीसारखे स्टार खेळाडू आहेत. एमबाप्पे विश्वचषकात गोल करणारा सर्वात तरुण फ्रेंच खेळाडू आहे. २०१८ च्या विश्वचषक फायनलमध्ये एमबाप्पेने गोल करुन पेलेची बरोबरी केली होती. किलियन एमबाप्पे चा जन्म पॅरिसपासून ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या बोंडी उपनगरात झाला. त्याने वयाच्या १४व्या वर्षी मोनॅको क्लबकडून खेळायला सुरुवात केली. त्यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. एम्बाप्पेची आई हँडबॉल खेळाडू आहे तर त्याचे वडील फुटबॉलपटू आहेत.

  एमबाप्पे सध्या जगातील सर्वोत्तम फुटबॉल खेळाडूंपैकी एक आहे. तो इतक्या वेगाने चेंडूवर झेपावतो की जगभरातील बचावपटूंना त्याला रोखणे कठीण होते. कायलियन एमबाप्पे जगातील सर्वात जलद धावणाऱ्या फुटबॉलपटूंमध्ये गणले जाते. २०१९ मध्ये २३.६१ किलोमीटर प्रतितास या वेगाने धावून त्याने बरीच चर्चा मिळवली होती. फिफा विश्वचषक २०२२ मध्ये त्याने सर्वाधिक दहा गोल करून यंदाच्या विश्वचषकातील ‘गोल्डन बूट’ पुरस्कार पटकावला आहे. यात त्याने सात गोल केलेल्या लिओनेल मेस्सीला मागे टाकले आहे.

  अंतिम सामन्यात एका मिनिटात दोन गोल; केला मोठा विक्रम

  अर्जेंटिना विरुद्ध फ्रान्स यांच्यात रंगलेला अंतिम सामना पूर्णपणे अर्जेंटिनाच्या बाजूने झुकताना दिसत असताना किलियन एमबाप्पेने मोठा उलटफेर घडवून आणला. सामन्याच्या 79 व्या मिनिटापर्यंत 2 – 0 ने आघाडीवर असलेल्या अर्जेंटिनाला किलियन एम्बाप्पेने अवघ्या एका मिनिटात जमिनीवर आणले. त्याने 80 व्या मिनिटाला पेनाल्टीवर गोल करत फ्रान्सचे खाते उघडले. आणि पुढच्याच मिनिटाला दुसरा गोल करत सामना एका मिनिटाच बरोबरीत आणला. याचबरोबर एम्बाप्पेने मोठ्या विक्रमाला देखील गवसणी घातली. तो आता फिफा वर्ल्डकपमध्ये 10 गोल करणारा सर्वात तरूण खेळाडू (23 वर्षे आणि 363 दिवस) ठरला आहे. त्याने गेरड मुलर यांचा (24 वर्षे 226 दिवस) विक्रम मोडला.

  एमबाप्पे फुटबॉल जगतातील मौल्यवान खेळाडू

  एमबाप्पे हा सध्या फुटबॉल जगतातील सर्वात मौल्यवान खेळाडू आहे. त्याची मार्केट व्हॅल्यू 1270 कोटी रुपये आहे. 2017 मध्ये फ्रान्ससाठी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळणाऱ्या एम्बाप्पेने 63 सामन्यांमध्ये 32 गोल केले आहेत. तो 2017 पासून पीएसजीकडून खेळत आहे. त्याने आतापर्यंत 221 सामन्यात 176 गोल केले आहेत. पीएसजीने एम्बाप्पेला मोनॅको फुटबॉल क्लबकडून सुमारे 1400 कोटी रुपयांना विकत घेतले होते.