दक्षिण आफ्रिके विरुद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला मिळणार संधी? पहा काय म्हणाले बॅटिंग कोच

    रविवारी ऑस्ट्रेलियाच्या पर्थ स्टेडियमवर भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका (India Vs South Africa)  यांच्यात सामना रंगणार आहे. हा सामना भारतीय संघासाठी अतिशय महत्वाचा असून या सामन्यात विजय मिळवल्यास सेमी फायनल मध्ये जाण्याचा मार्ग संघासाठी अतिशय सुकर होईल. उद्या दुपारी ४:३० वाजता भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्याला सुरुवात होणार आहे. मात्र या सामन्यात भारताच्या प्लेईंग ११ मध्ये कोणते महत्वाचे बदल केले जाणार हे पाहणं औसुक्याच ठरणार आहे.

    दक्षिण आफ्रिके विरुद्ध सामन्यापूर्वी भारतीय संघाचे बॅटिंग कोच विक्रम राठोर (Vikram Rathour) यांना प्लेइंग इलेव्हनबाबत पत्रकार परिषदेत प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले, पर्थची खेळपट्टीही दक्षिण आफ्रिकेच्या वेगवान आक्रमणाला साथ देईल, असे मानले जात आहे. मात्र भारताकडे चार वेगवान गोलंदाज आहेत. आतापर्यंत त्याने खेळपट्टी पाहिली नाही आणि खेळपट्टीची पाहणी केल्यानंतरच प्लेइंग इलेव्हनबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल.

    भारतीय संघातील सलामीचा फलंदाज के एल राहुल सध्या खराब फॉर्मशी झुंज देत आहे. यंदाच्या विश्वचषकातील दोन्ही सामन्यात तो काही खास कमाल दाखवू शकला नाही. अशा परिस्थिती दक्षिण आफ्रिके विरुद्ध सामन्यात प्लेईंग ११ मध्ये के एल राहुल ऐवजी ऋषभ पंत याला संधी मिळणार का? असा प्रश्न विक्रम राठोर याना विचारण्यात आला. यावर ते म्हणाले, सध्या सलामीच्या जोडीमध्ये कोणताही बदल करण्यात येणार नाही आहे. लोकेश राहुलऐवजी आम्ही ऋषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेणार नाही आहोत. त्यामुळे पर्थमध्ये फक्त लोकेश राहुल खेळणार आहे. पंतला संघाने तयार राहण्यास सांगितले असून लवकरच संधी दिली जाईल.