मुंबई-कोलकाता सामना पावसामुळे रद्द होणार? हवामानामुळे चाहत्यांचं टेन्शन वाढलं

चला तर मग जाणून घेऊया या सामन्यादरम्यान कोलकाताचे हवामान कसे असेल आणि चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल की नाही.

    मुंबई विरुद्ध कोलकाता : मुंबई इंडियन्स आणि कोलकाता नाईट रायडर्स आमनेसामने असणार आहेत. आजच्या सामन्यांमध्ये कोलकाताला प्लेऑफमध्ये स्थान पक्के करण्याची संधी आहे. त्यामुळे कोणता संघ आज विजय मिळवणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. गुणतालिकेचा विचार केला तर कोलकाता नाईट रायडर्स सध्या अव्वल स्थानावर आहे तर मुंबई इंडियन्स आता प्लेऑफ च्या शर्यतीतून बाहेर झाली आहे. गुणतालिकेत मुंबई इंडियास नवव्या स्थानावर आहे. उभय संघांमधील मोसमातील 60 वा साखळी सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाईल. मात्र या सामन्यापूर्वी कोलकात्यातील हवामानामुळे चाहत्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

    मागील काही दिवसांपासून कोलकात्यात पाऊस पडत आहे. अशा स्थितीत आज मुंबई आणि कोलकाता यांच्यातील सामन्यातही पावसामुळे व्यत्यय येऊ शकते असा अंदाज लावला जात आहे. चला तर मग जाणून घेऊया या सामन्यादरम्यान कोलकाताचे हवामान कसे असेल आणि चाहत्यांना या सामन्याचा आनंद घेता येईल की नाही.

    जाणून घ्या कसे असेल कोलकात्यात हवामान?
    कोलकात्याच्या खराब हवामानामुळे नाईट रायडर्स संघ लखनौहून कोलकात्यात वेळेवर पोहोचू शकला नाही. खराब हवामानामुळे संघाचे विमान कोलकात्यात उतरू शकले नाही, त्यानंतर त्याचा मार्ग वाराणसीच्या दिशेने बदलण्यात आला. केकेआरच्या खेळाडूंनी वाराणसीमध्ये एक रात्र घालवली आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी संध्याकाळी कोलकात्यात उतरले. कोलकात्यात गेल्या काही दिवसांपासून पाऊस पडत आहे. आजच्या हवामानाचा विचार केला तर ढगांसह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. अहवालांवर विश्वास ठेवला तर शनिवारी सकाळी आणि दुपारी पाऊस पडण्याची शक्यता 80 टक्के आहे. त्यानंतर संध्याकाळी पावसाची शक्यता 25 टक्के कमी होईल. रात्री तापमान 25 अंशांच्या आसपास राहू शकते. या कालावधीत आर्द्रता ८८ टक्क्यांपर्यंत राहू शकते.

    सामन्यादरम्यान आकाश 93 टक्क्यांपर्यंत ढगाळ असेल. आता पावसामुळे सामन्यात व्यत्यय येतो की चाहत्यांना संपूर्ण सामन्याचा आनंद घेता येतो हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.