फिफा विश्वचषकात रोनाल्डोच्या पोर्तुगालची विजयी सुरुवात

फिफा क्रमवारीत पोर्तुगाल नवव्या क्रमांकावर असून घानाचा संघ तब्बल ६१ व्या स्थानी आहे. मात्र तरी देखील घाना संघाने रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला कडवी झुंज दिली.

    कतार येथे सुरु असलेल्या फिफा विश्वचषक स्पर्धेत (FIFA World Cup) काल पोर्तुगाल विरुद्ध घाना या दोन संघांमध्ये सामना पारपडला. पोर्तुगाल संघाचा विश्वचषकातील ही विजयी सुरुवात ठरली. पोर्तुगाल संघाने घाना संघाचा ३-२ ने पराभव केला.

    फिफा क्रमवारीत पोर्तुगाल नवव्या क्रमांकावर असून घानाचा संघ तब्बल ६१ व्या स्थानी आहे. मात्र तरी देखील घाना संघाने रोनाल्डोच्या पोर्तुगाल संघाला कडवी झुंज दिली. विशेष म्हणजे सामना हाल्फ टाईमपर्यंत अगदी सामान्य दिसून येत होता. दोन्ही संघाना एकही गोल करता आला नव्हता. पण दुसऱ्या हाल्फमध्ये तब्बल ५ गोल झाले, यात पोर्तुगालने ३ तर घानाने दोन गोल केले. सर्वात आधी ६५ व्या मिनिटाला पोर्तुगालला पेनल्टी मिळाली जी कॅप्टन रोनाल्डोने घेत गोल केला आणि संघाला १-० अशी आघाडी मिळवून दिली. त्यानंतर लगेचच ७३ व्या मिनिटाला घानाने उत्कृष्ट खेळ दाखवला आणि त्यांचा कर्णधाराने गोल करत सामन्यात बरोबरी साधली.

    ७८ व्या मिनिटाला युवा स्टार खेळाडू फेलिक्सने ब्रुनो फर्नांडिसच्या जबरदस्त असिस्टव गोल करत पोर्तुगालची आघाडी वाढवली. ज्यानंतर काही मिनिटांतच म्हणजेच ८० व्या मिनिटाला पुन्हा ब्रुनोने दिलेल्या असिस्टवर लिओने गोल करत पोर्तुगालची आघाडी ३-१ अशी केली. ज्यानंतर पोर्तुगाल सहज जिंकेल असे वाचक होते. पण बुकारी याने ८९ व्या मिनिटाला घानासाठी गोल करत सामना अजून बाकी आहे हे दाखवून दिले, मग अधिकची ९ मिनिटं देण्यात आली, ज्यात दोन्ही संघानी आक्रमणं केली. पण अखेर एकही गोल झाला नाही आणि ३-२ ने पोर्तुगालने सामना जिंकला. विशेष म्हणजे आजच्या गोलच्या मदतीनं पाच वेगवेगळ्या विश्वचषकात गोल करण्याचा रेकॉर्ड रोनाल्डोने केला आहे.