आंतरराष्ट्रीय स्पर्धेत ठाण्यातील महिला पोलिसाने मिळवले यश

    ठाणे : युरोपातील बाकु आझरभाईजान येथे २८ जुलै ते ३ ऑगस्ट २०२२ दरम्यान आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय बेल्ट आणि मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये ठाण्यातील पोलीस नाईक शीतल खरटमल यांनी एक कांस्य आणि रौप्य पदकाची कमाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बेल्ट आणि मास्क रेसलींग चॅम्पिअनशिपमध्ये ४२ विविध देशातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

    ठाण्यातील पोलीस अंमलदार शीतल खरटमल यांनी आंतरराष्ट्रीय बेल्ट रेस्लींग प्रकारात कास्य पदक आणि मास्क रेसलिंग प्रकारात रौप्य पदक प्राप्त करून देत ठाण्याचा झेंडा सातासमुद्रापार फडकावला आहे. याशिवाय येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘नॅशनल हाईलँड फेस्टिव्हल’ या अझरबैजान प्रजासत्ताक येथील युवा आणि क्रीडा मंत्रालय, जागतिक एथनोस्पोर्ट कॉन्फेडरेशन, अझरबैजान प्रजासत्ताकचे सांस्कृतिक मंत्रालय यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय महोत्सव स्पर्धेत कल्चर प्रकारात भारतीय संघाला रौप्य पदक प्राप्त करून दिले आहे.

     

    युरोपातील बाकु आझरभाईजान येथील स्पर्धेसाठी महाराष्ट्रतील १३ खेळाडूची सराव निवड चाचणी करण्यात आली होती. यात ५५ किलो महिला वजनी गटात ठाण्यातील पोलीस नाईक शीतल खरटमल यांची निवड झाली होती.

    शितल खरटमल ठाणे ग्रामीण पोलीस अंमलदार असून गेली १२ वर्षे त्या सेवेत आहेत. या यशाबाबत शीतल सांगतात कि, ‘अत्यंत कठीण अशा या स्पर्धेत राष्ट्रीय स्तरावर माझे मार्गदर्शक असलेल्या सी.ए. तांबोळी सर, मार्गदर्शक आणि प्रशिक्षक मधुकर पगडे, अमोल साठे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच माझ्या कुटुंबाचीही यात मोठा वाटा असून आई निर्मला आणि वडील मल्लिकार्जुन यांचीही मी ऋणी आहे’.