पाकिस्तानने मोडली २७ वर्षाची परंपरा, पहिल्या सामन्यात नेदरलँड्सचा केला पराभव

रिझवानने ७५ धावांवर ६८ धावा केल्या, ज्यात आठ चौकारांचा समावेश होता. सौद शकीलनेही केवळ ५२ चेंडूंचा सामना करत ६८ धावा केल्या.

    वर्ल्ड कप २०२३ : पाकिस्तानने वर्ल्ड कप २०२३ मधील आपल्या मोहिमेची चांगली सुरुवात केली आहे. हैदराबादमध्ये ६ ऑक्टोबर रोजी झालेल्या सामन्यात नेदरलँड्सचा ८१ धावांनी पराभव केला. या सामन्यात पाकिस्तानने नेदरलँडला २८७ धावांचे लक्ष्य दिले होते, ज्याचा डच संघ यशस्वी पाठलाग करू शकला नाही. पाकिस्तानचा संघ आता १० ऑक्टोबरला हैदराबादमध्ये श्रीलंकेशी पुढचा सामना खेळणार आहे.

    नेदरलँड्ससाठी, बास डी लीडेने फलंदाजीसह चमकदार कामगिरी केली. डी लीडेने ६८ चेंडूत ६ चौकार आणि २ षटकारांसह ६७ धावा केल्या. सलामीवीर विक्रमजीत सिंगनेही ६७ चेंडूत ५२ धावांची खेळी केली. विक्रमजीतने आपल्या खेळीत चार चौकार आणि एक षटकार लगावला. पाकिस्तानी संघाकडून हरिस रौफने तीन आणि हसन अलीने दोन बळी घेतले. शाहीन आफ्रिदी, मोहम्मद नवाज, शादाब खान आणि इफ्तिखार अहमद यांनाही प्रत्येकी एक विकेट मिळाली.

    भारतीय भूमीवर विश्वचषकात पाकिस्तान संघाचा हा पहिला विजय ठरला. याआधी पाकिस्तानने भारतीय भूमीवर एकदिवसीय विश्वचषकात केवळ दोन सामने खेळले होते आणि दोन्ही सामने गमावले होते. १९९६ च्या विश्वचषकात त्याने भारताविरुद्ध पहिला सामना खेळला होता, ज्यात त्याला ३९ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर २०११ मध्ये भारताविरुद्ध २९ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता नेदरलँडला हरवून पाकिस्तानने २७ वर्षांचा दुष्काळ संपवला आहे.

    नाणेफेक हारल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेल्या पाकिस्तानी संघाची सुरुवात खूपच खराब झाली. पॉवरप्लेमध्येच त्याने ३८ धावांपर्यंत तीन विकेट गमावल्या. प्रथम फखर जमानला लोगान व्हॅन बीकने झेलबाद केले. त्यानंतर कर्णधार बाबर आझम फिरकी गोलंदाज अकरमनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. यानंतर दुसरा सलामीवीर इमाम उल हक पॉल व्हॅन मीकरेनच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. तीन विकेट पडल्यानंतर मोहम्मद रिझवान आणि सौद शकील यांनी १२० धावांची भागीदारी करत डावाचा ताबा घेतला.

    रिझवानने ७५ धावांवर ६८ धावा केल्या, ज्यात आठ चौकारांचा समावेश होता. सौद शकीलनेही केवळ ५२ चेंडूंचा सामना करत ६८ धावा केल्या. शकीलने आपल्या खेळीत नऊ चौकार आणि एक षटकार लगावला. नंतर मोहम्मद नवाज आणि शादाब खान यांनी सातव्या विकेटसाठी ६४ धावा जोडल्या आणि पाकिस्तानला २८६ धावांपर्यंत मजल मारता आली. नवाजने ३९ आणि शादाबने ३२ धावा केल्या. नेदरलँड्ससाठी बास डी लीडेला चार, तर कॉलिन अकरमनला दोन यश मिळाले.