भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी विश्वचषकात 80 पेक्षा जास्त सामने खेळले आहेत, जाणून घ्या विजय आणि पराभवाचा संपूर्ण प्रवास

१९९२ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ७ वेळा आमनेसामने आले आहेत.

    वर्ल्ड कप २०२३ : भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यामधील महामुकाबल्यासाठी काही तासचं शिल्लक राहिले आहेत. हा महामुकाबला अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. १४ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या लढतीसाठी दोन्ही संघ सराव सत्रात चांगलाच घाम गाळत आहेत . खेळाडूंशिवाय क्रिकेट चाहतेही या सामन्याची तयारी पूर्ण करण्यात व्यस्त आहेत. मात्र, या शानदार सामन्यापूर्वी आम्ही दोन्ही संघांच्या विश्वचषकातील आतापर्यंतच्या सामन्यांचे तपशील काय आहेत ते जाणून घेऊयात.

    भारताच्या संघाने आतापर्यत वर्ल्ड कपमध्ये एकूण ८६ सामने खेळले आहेत या सामन्यांमध्ये ५५ सामने जिंकले आहेत. या काळात टीम इंडियाने २९ सामनेही गमावले आहेत. एक सामना बरोबरीत तर एक सामना अनिर्णित राहिला आहे. अशा स्थितीत टीम इंडियाची वर्ल्डकप जिंकण्याची टक्केवारी ६५.२९ इतकी आहे. उल्लेखनीय आहे की टीम इंडियाने आतापर्यंत दोनदा वर्ल्ड कप जिंकला आहे. टीम इंडिया पहिल्यांदा १९८३ मध्ये आणि दुसऱ्यांदा २०११ मध्ये चॅम्पियन बनली होती.

    पाकिस्तान संघाची विजयाची टक्केवारी भारतापेक्षा थोडी कमी आहे. पाकिस्तानने वर्ल्ड कपमध्ये आतापर्यंत एकूण ८१ सामने खेळले आहेत. पाकिस्तान संघाने ४७ सामने जिंकले असून ३२ सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला आहे. पाकिस्तान संघाचे दोन सामनेही अनिर्णित राहिले आहेत. अशाप्रकारे पाकिस्तान संघाच्या विश्वचषकातील विजयाची टक्केवारी ५९.४९ इतकी आहे. पाकिस्तानचा संघ एकदाच विश्वचषक चॅम्पियन बनला आहे. १९९२ मध्ये इम्रान खानच्या नेतृत्वाखाली पाकिस्तानने विश्वचषक जिंकला होता. विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान ७ वेळा आमनेसामने आले आहेत. भारत आणि पाकिस्तान विश्वचषक स्पर्धेत खेळलेल्या ८०-८० पेक्षा जास्त सामन्यांपैकी हे संघ ७ वेळा एकमेकांसमोर आले आहेत. या सात सामन्यांमध्ये भारताच्या संघाने विजय मिळवला आहे. म्हणजेच विश्वचषकातील हेड टू हेड रेकॉर्ड पाहता टीम इंडियाची पाकिस्तानविरुद्धच्या विजयाची टक्केवारी १०० आहे.