जागतिक कुस्ती स्पर्धेत बजरंग पुनियाला कांस्यपदक

    सर्बियाची राजधानी बेलग्रेड येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेत (World Wrestling Championship) भारताने दुसरे पदक पटकावले आहे. कुस्तीपटू बजरंग पुनियाने (Bajrang Punia) पुरुषांच्या ६५ किलो फ्रीस्टाइल वजन गटात हे पदक जिंकले असून कांस्यपदकाच्या (Bronze) लढतीत बजरंगने पोर्तो रिकोच्या सेबॅस्टियन रिवेराचा ११-९ ने पराभव केला. यापूर्वी महिला कुस्तीपटू विनेश फोगटने या स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते. यासह बजरंग पुनियाचे हे जागतिक कुस्ती स्पर्धेतील चौथे पदक आहे.

    बजरंगने यापूर्वी २०१३ आणि २०१९ चॅम्पियनशिपमध्येही कांस्यपदक जिंकले होते. त्याचबरोबर २०१८ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य पदक जिंकण्यात तो यशस्वी ठरला. स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत बजरंग पुनियाला अमेरिकेच्या जॉन डायकोमिहलिसने पराभूत केले. जॉनला अंतिम फेरी गाठण्यात यश आल्याने बजरंगला रेपेचेज फेरी खेळण्याची संधी मिळाली. रिपेचेजच्या पहिल्या सामन्यात बजरंगने आर्मेनियाच्या वेगेन टेवान्यानचा चुरशीच्या लढतीत पराभव केला. परंतु कांस्यपदकाच्या लढतीचा विचार केला तर बजरंग एका वेळी ०-६ ​​ने पिछाडीवर होता. मात्र यानंतर बजरंगने शानदार पुनरागमन करत सेबॅस्टियन रिवेराचा पराभव केला.

    बजरंग पुनिया कझाकस्तानमधील नूर सुलतान येथे झालेल्या जागतिक कुस्ती स्पर्धेच्या उपांत्य फेरीत पोहोचून २०१९ मध्ये पहिल्यांदाच ऑलिम्पिकसाठी पात्र ठरला होता. त्या चॅम्पियनशिपमध्ये बजरंगने कांस्यपदक जिंकले होते. जागतिक कुस्ती स्पर्धेतील हे त्याचे तिसरे पदक होते. टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये बजरंगकडून सुवर्णपदकाची अपेक्षा होती, मात्र त्याला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. ६५ किलो वजनी गटात बजरंग पुनियाने कझाकिस्तानचा कुस्तीपटू दौलत नियाजबेकोव्हचा ८-० असा पराभव करत कांस्यपदक मिळवले.