युवराज सिंहच्या ‘या’ विक्रमला १५ वर्ष पूर्ण

    भारताचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंह (Yuvraj Singh)  हा त्याच्या तडाखेबाज फलंदाजीमुळे क्रिकेट चाहत्यांच्या स्मरणात राहिला आहे. युवराजने त्याच्या कारकिर्दीत अनेक मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे. मात्र क्रिकेटच्या मैदानात त्यानं रचलेला एक विक्रम अजूनही आभादीत राहिला आहे. आज १९ सप्टेंबर रोजी या विक्रमला १५ वर्ष पूर्ण झाली आहे. तो विक्रम म्हणजे २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध सहा चेंडूत सहा षटकार मारून युवराजने रचलेला इतिहास. आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणार युवराज सिंह पहिला खेळाडू आहे.

    २००७ च्या टी-२० विश्वचषकातील (T20 World cup) गट सामन्यात भारत आणि इंग्लंड आमने सामने आले होते. या सामन्यात युवराज सिंहनं १६ चेंडूत ५८ धावा केल्या. ज्यात ७ षटकार आणि ३ चौकारांचा समावेश होता. विशेष म्हणजे, त्यानं स्टुअर्ट ब्रॉडच्या एका षटकात सहा षटकार ठोकले. या सामन्यातील १९ व्या षटकात युवराजने सहा षटकार मारून इतिहास रचला.

    युवराजच्या वादळी अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने इंग्लंडसमोर २१८ धावांचे लक्ष्य ठेवले होते. या विक्रमाची आठवण प्रत्येक भारतीय क्रिकेट चाहत्यांच्या मनात आजही आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि तडाखेबाज फलंदाज युवराज सिंहने १० जून २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली.