समृद्धी महामार्गाचे ४४ टक्के काम पूर्ण शिर्डीपर्यंतचा महामार्ग महाराष्ट्र दिनी खुला होणार

या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला निश्चितच गती मिळणार असून शेतकऱ्यांना आपला शेतमाल वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे. यासोबतच राज्यातील विविध रस्त्यांच्या सुधारणांसाठीही भरघोष तरतूद केली असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे.

    मुंबई : समृद्धी महामार्गाचे ४४ टक्के काम पूर्ण झाले असून, शिर्डीपर्यंतचा मार्ग येत्या १ मेला महाराष्ट्र दिनी खुला करण्यात येणार असल्याची अजित पवार यांनी दिली. या महामार्गामुळे उद्योगधंदे आणि आर्थिक विकासाला चालना मिळणार असल्याचेही पवार यांनी सांगितले.

    या महामार्गामुळे महाराष्ट्राच्या अर्थचक्राला निश्चितच गती मिळणार असून शेतकऱ्यांना आपला शेतमाल वेळेत पोहोचविणे शक्य होणार आहे. यासोबतच राज्यातील विविध रस्त्यांच्या सुधारणांसाठीही भरघोष तरतूद केली असल्याची घोषणाही अजित पवार यांनी केली आहे.

    हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग तयार करताना वन्यप्राण्यांच्या मुक्तवावराचा विचार करण्यात आला आहे. वन्यप्राण्यांना नैसर्गिकरीत्या व निर्धोकपणे रस्ता ओलांडता यावा यासाठी वनक्षेत्रातून जाणाऱ्या या महामार्गावर २९५ ठिकाणी उन्नत, भुयारी मार्ग तयार करण्यात येणार आहेत. महामार्गाच्या आराखड्यात तसा बदल केला आहे. वन्यप्राण्यांना त्रास होऊ नये, यासाठी भुयारी मार्ग व पुलाखाली ध्वनिरोधक यंत्रणा बसविण्यात येणार आहे.
    रस्ते, महामार्ग ओलांडताना वाहनांच्या धडकेने अनेकदा वन्यप्राणी जखमी होतात, दगावतात. हे प्राणी रस्त्यावर येऊ नयेत, म्हणून फार तर रस्त्यांच्या दोन्ही बाजूंना जाळ्यांचे कुंपण घातले जाते. परंतु, त्यामुळे त्यांचा नैसर्गिक वावर रोखला जातो. समृद्धी महामार्ग सुमारे ७०० किलोमीटरचा आहे. केवळ सहा तासांत मुंबईहून नागपूरला पोहोचता येणार आहे.

    १४ जिल्ह्यांतून हा महामार्ग जात आहे. त्यांपैकी ११८ किलोमीटरचा पट्टा हा वनक्षेत्रातून जातो. भारतीय वन्यजीव महामंडळाने क्षेत्रीय स्तरावर केलेल्या पाहणीनुसार या परिसरात नीलगाय, चिंकारा, भारतीय ससा, साळिंदर, रानडुक्कर, काळवीट यांसारखे शाकाहारी प्राणी, तसेच रानमांजर, बिबट, सोनेरी कोल्हा, भारतीय कोल्हा, भारतीय लांडगा, पट्टेवाला तरस, अस्वल यांसारख्या मांसाहारी प्राण्यांचा वावर असल्याचे आढळून आले आहे.