पेणमध्ये ४० ते ५० टक्के गणेशमूर्तींची झाली नाही विक्री

 पेण: सर्वत्र जगभर गणेश मूर्तीसाठी आणि निर्मितीसाठी प्रसिद्ध असणाऱ्या पेण व पेण परिसरातील गणेशमूर्तीकारांना कोरोना, लॉकडाऊन आणि निसर्ग चक्रीवादळ यासह अनेक आपत्तींमुळे यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. दरवर्षी सुमारे दहा लाख विविध प्रकारच्या गणेशमूर्तींची निर्मिती केली जाते. त्याचप्रमाणे यंदाही करण्यात आली. मात्र त्यापैकी ४० ते ५० टक्के गणेशमूर्तींची विक्री होऊ शकलेली नाही.

कोरोना निर्बंधामुळे गणेशमूर्तींना दोन फुटांची अट घातली गेल्याने तसेच त्यापेक्षा अधिक उंचीच्या मूर्ती अधिक असल्याने गणेशमूर्तिकारांवर संकटच आले आहे, असे संघटनेचे अध्यक्ष श्रीकांत देवधर यांनी सांगितले. सर्वसाधारणपणे फेब्रुवारी व मार्च महिन्याच्या अखेरपर्यंत गणेशमूर्ती जेएनपीटी बंदरातून बोटीने परदेशात निर्यात होत असतात. मात्र यंदा  निर्यात धोरणामुळे प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना बंदीचा आदेश होता. तो केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांच्यामुळे बदलून मिळाला आणि यंदाच्या एका वर्षासाठी प्लास्टरच्या मूर्तींना परवानगी मिळाली आणि पेणच्या मूर्तिकारांना मोठा दिलासा मिळाला. मात्र कारागीर आणि कामगार कारखान्यात पोहोचू शकले नाही. परिणामी अपेक्षित काम होऊ शकले नाही

  कच्च्या मूर्ती तयार केलेल्या होत्या आणि त्याच दरम्यान ३ जून रोजी आलेल्या निसर्ग चक्रीवादळात अनेक गणेश मूर्तीकारांच्या कार्यशाळा उध्वस्त झाल्या. काहींचे छप्पर उडून गेले. चक्रीवादळाच्या नुकसानातून मूर्तिकार कसेबसे सावरत असतानाच करण्याच्या पार्श्वभूमीवर शासनाची गणेश मूर्तीच्या दोन फूट उंचीची अट आली आणि तिसरा धक्का गणेश मूर्तीकारांना बसला. दोन फुटांपेक्षा अधिक उंचीच्या तयार मूर्ती करायचे काय असा मोठा प्रश्न निर्माण झाला. मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर यासारख्या राज्यातील मोठ्या शहरांमध्ये दरवर्षी गणेशमूर्ती विक्रेत्यांना गिऱ्हाईक मिळेनासे झाले. जे विक्रेते १००० मूर्ती घाऊक दरात घेत असत त्यांनी यंदा शंभर ते दोनशे मूर्ती घेण्याचा निर्णय घेतला आणि आणि तेथे मूर्तीकारांना चौथा मोठा व्यावसायिक फटका बसला आहे. अंतिम आणि सर्वात मोठे पाचवे संकट गणेशोत्सवानंतर गणेशमूर्तीकारांवर येऊन धडकणार आहे ते म्हणजे बँकांच्या व्यावसायिक कर्जाची परतफेड. देशातील गणेशमूर्ती निर्मितीचा हा एकमेव व्यवसाय असा आहे की ज्याला बँकांकडून व्यावसायिक कर्ज दिले जाते.  गणेश मूर्तींची संपूर्ण विक्री झाल्यानंतर गणेशोत्सव झाल्यावर एक रकमी कर्जाची परतफेड केली जाते परंतु यंदाही एकरकमी कर्जफेड कशी करायची हे मोठे विघ्न गणेश मूर्तिकारांसमोर आहे.  त्यामुळे विघ्नहर्त्याच्या नगरीमध्ये गणेश मूर्तिकारांवर अनेक संकट आल्याने पेण तालुक्यासह आजूबाजूच्या ग्रामीण मूर्तिकारांवरयावर्षी कर्ज बाजारी होण्याची वेळयेणार असल्याचे अनेक मूर्तिकारांनी सांगितले आहे.