महाड नगर पालिकेच्या ५ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण, नगराध्यक्षांचे शहरवासीयांसाठी निवेदन

महाड: गेले पाच महिने सर्वजण कोरोना संसर्गाविरोधात लढा देत आहेत. यामध्ये पालिकेच्या सफाई कामगारांचे योगदान अर्थातच शिखराएवढे आहे. त्यांना कोरोना संसर्ग होणार हे ग्राह्य धरले गेले होते. आपण सर्वजण या कोरोनाच्या संकटाशी सामना करत आहोत. या संकटकाळी फ्रंटलाईनला काम करणारे आपल्या नगरपालिका अधिकारी व सर्व विभागातील कर्मचारी यांचे काम हे अतिशय वाखाणण्याजोगे आहे. हे सर्वच जण आपल्या नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी जिवाची बाजी लावून काम करत आहेत. महाड नगरपालिकेच्या काही कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.  या वृत्तानंतर महाडच्या नगराध्यक्षा स्नेहल जगताप यांनी एका निवेदनाद्वारे महाडकर नागरिकांना आवाहन केले आहे.

यात त्यांनी म्हटले आहे की, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या शासकीय आदेशानुसार महाड नगरपालिका अधिकारी व कर्मचारी यांच्या कोरोना चाचणी ग्रामीण रुग्णालय, महाड येथे डॉ.भास्कर जगताप यांच्या देखरेखीखाली करण्यात आली. दुर्दैवाने यातील ५ कर्मचारी (४पुरुष/१ महिला) हे कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे अहवाल प्राप्त झाला आहे. डॉ.जगताप यांच्या सल्ल्याने त्यांच्यावर उपचार सुरू आहेत व ते सर्वजण लवकरच बरे होतील, अशी मला खात्री आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण नगरपालिका इमारत ही निर्जंतुकीकरण करण्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे.

निवेदनात पुढे म्हटले आहे की, जिल्हाधिकारी निधी चौधरी यांच्या आदेशानुसार उद्या १३ ऑगस्ट रोजी नगरपालिका प्रशासकीय कामकाज हे बंद राहणार आहे. त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती व आवाहन आहे की पुढचा आदेश येईपर्यंत आपण कोणीही कोणत्याही प्रकारच्या कामानिमित्त नगरपालिकेमध्ये येऊ नये. आपले नगरपालिका प्रशासन हे आपल्यासाठी सदैव तत्पर आहे. आपणसुद्धा नगरपालिका प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महाडच्या नगराध्यक्षांकडून करण्यात आले आहे.