एसटीचे ‘बेस्ट’कडे ६० कोटी थकले, वेतनासाठी अधिकाऱ्यांची धावपळ, बेस्टकडून टाळाटाळ

  मुंबई : कोरोना संकटात बेस्ट प्रशासनाला सहकार्य करणाऱ्यासाठी धावून आलेल्या एसटी महामंडळाला थकबाकी रक्कम मिळावी म्हणून चक्क बेस्ट भवनात खेटे मारावे लागत आहेत. एसटीचे तब्बल ६० कोटी रुपये बेस्ट प्रशासनाने थकवले आहेत.

  एसटी महामंडळात पगार थकल्याने एसटी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष उफाळून आला आहे. त्यामुळे पैशांची जुळवाजुळव करण्यासाठी महामंडळाचे अधिकारी सर्व पर्याय आजमावून पाहत आहेत. मात्र बेस्टच्या आडमुठेपणामुळे एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्यांना साठ कोटींच्या वसुलीसाठी बेस्ट भवनाचे उंबरे झिजवावे लागत असल्याचे एसटी महामंडळातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

  एसटी महामंडळाने कोरोना काळात तब्बल नऊ महिने बेस्टला अिवरत सेवा दिली. तरीही बेस्ट प्रशासनाकडून थकित देय मिळत नाही, ही बाब अत्यंत चुकीची आहे. बेस्टकडून व्याजासकट शिल्लक देय वसूल करा; अन्यथा बेस्टच्या मुख्य कार्यालयावर संघटनेच्यावतीने मोर्चा काढू.

  एसटी महामंडळाने कोरोना काळात तब्बल नऊ महिने बेस्टला अिवरत सेवा दिली. तरीही बेस्ट प्रशासनाकडून थकित देय मिळत नाही, ही बाब अत्यंत चुकीची आहे. बेस्टकडून व्याजासकट शिल्लक देय वसूल करा; अन्यथा बेस्टच्या मुख्य कार्यालयावर संघटनेच्यावतीने मोर्चा काढू.

  - श्रीरंग बरगे सरचिटणीस महाराष्ट्र एस.टी.कर्मचारी काँग्रेस

  कोरोना संकट काळात तब्बल नऊ महिने लालपरीने बेस्ट उपक्रमाच्या मार्गावर अविरत सेवा दिली होती. यातून एसटी महामंडळाला १९६ कोटी ३५ लाखांचे उत्पन्न  मिळाले. महिना संपत आला तरीही अद्याप एसटीच्या कर्मचाऱ्यांचे पगार झाले नाहीत. राज्य सरकारकडून मिळणाऱ्या निधीलाही विलंब होणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे बेस्ट प्रशासनाने थकित देय दिल्यास कर्मचाऱ्यांचे पगार देण्यास आर्थिक हातभार लागेल असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

  दरम्यान, याबाबत महामंडळाचे जनसंपर्क अधिकारी राजन शेलार यांच्याशी संपर्क साधला असता, संपर्क होवू शकला नाही.

  वसुलीसाठी बेस्ट भवनाला चकरा

  कोरोना काळात बेस्टच्या मदतीला धावलेल्या लालपरीला मोठा आर्थिक आधार मिळाला होता. पण एसटीला मिळालेल्या एकूण उत्पन्नापैकी अद्यापही ६० कोटी रुपये थकीत आहेत. यासाठी महामंडळाचे अधिकारी बेस्ट भवनात चक्करा मारत आहेत. थकीत ६० कोटी राज्य सरकार देणार? असे उत्तर बेस्ट प्रशासनाकडून दिले जात आहे, यामुळे महामंडळाचे अधिकाऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

  एसटीचे कर्मचारी तणावाखाली

  वेतन वेळेत मिळत नसल्याने कर्मचारी तणावाखाली आहेत, मागील काही महिन्यात दोन कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. कर्मचाऱ्यांना वेळेत पगार मिळण्यासाठी महामंडळाचे सर्वतोपरी प्रयत्न सुरु असल्याचे वरिष्ठ अधिकारी खासगीत सांगत आहेत.

  ऑगस्टचा पगार मिळण्याकरीता अजून आठवडा लागणार?

  ती दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या एका बैठकीत एसटी महामंडळाला ५०० कोटी देण्याचे मंजुर करण्यात आले. पण, याबाबतचा प्रत्यक्षात अंतिम निर्णय होईपर्यंत अजून ७ ते ८ दिवस लागतील, त्यानंतर कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची शक्यता असल्याचे अधिकारी सांगतात. यामुळे वरिष्ठ अधिकारी आर्थिक जुळवाजुळव करण्यास जोरदार प्रयत्न करत आहेत.