गुरुवारी मत्स्य विकास मंत्री यांच्या दालनात विशेष सभेचे आयोजन; खा. तटकरे यांचा पुढाकार

आगरदांडा जेट्टीवरील मच्छिमारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी गुरुवारी (ता. १३ऑगस्ट) रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे.

मुरुड जंजिरा : आगरदांडा जेट्टीवरील मच्छिमारांच्या विविध मागण्या पूर्ण करण्यासाठी गुरुवारी (ता. १३ऑगस्ट) रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. रायगडचे खासदार सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत ही सभा मत्स्यविकास राज्यमंत्री दत्ता भरणे यांच्या दालनात होणार आहे. आगरदांडा बंदरात नाखवा संघटनेने आंदोलन केल्यावर त्याची प्रत्यक्ष पाहणी तटकरे यांनी केली त्यावेळी ते बोलत होते. तटकरे यांनी यावेळी येथील कोळी बांधवांच्या समस्या जाणून घेतल्या व त्वरित या ठिकाणी सभा आयोजित करून त्यांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला.

यावेळी मच्छिमारांच्या समस्या मांडताना मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समनव्यक प्रकाश सरपाटील म्हणाले की, आगरदांडा जेट्टी ही मच्छिमारांसाठी योग्य व सुरक्षित आहे. आम्हाला येथे मासळी व्यवसायाकरिता पुढील मोठ्या मच्छिमार बंदराची व्यवस्था होईपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात सुविधा तयार करून मिळावी अशी मागणीही सरपाटील यांनी केली. समुद्रातून पकडलेली मासळी विकण्यासाठी व्यवस्था नसल्याने पकडलेली मासळी वाया जात असल्याचे त्यांनी खासदार तटकरे यांच्या निदर्शनास आणून दिले.

“तातडीने जेट्टी जरी मंजूर केली तरी याच्या उभारणीसाठी किमान दीड वर्षाचा कालावधी उभारणीसाठी लागणार आहे. मच्छिमारांना कायम स्वरूपी जेट्टी मिळाली पाहिजे. मासळीला वाढती मागणी असून शीतगृह सुद्धा विकसित करता आले पाहिजे. कोळी समाजाने फेडरेशन तयार करून आपला विकास साधला पाहिजे. मासेमारी बरोबरच विविध प्रक्रिया करणारी साधने सुद्धा निर्माण केल्यास लोकांना सुविधा व पैसेही उपलब्ध होण्यास मदत होणार आहे.” अशी माहिती यावेळी तटकरे यांनी दिली.

मासळीची विक्री करण्यासाठी जेट्टी आपणास उपलब्ध होण्यासाठी येत्या गुरुवारी मत्स्य विकास मंत्री यांच्या दालनात विशेष सभा आयोजित केली असून नाखवा संघाच्या तीन प्रतिनिधींनी त्या ठिकाणी उपस्थित रहावे व त्या ठिकाणीच आपल्या जेट्टी बाबतचा निर्णय होईल.मच्छिमारांना आवश्यक असलेली तातडीने तात्पुरत्या स्वरूपाची जेट्टी बाबतचा निर्णय मत्स्य विकास राज्य मंत्री यांच्या समक्ष घेण्यात येईल असे आश्वासनही यावेळी खासदार तटकरे यांनी दिले. तटकरे यांच्या भेटीमुळे मुरुड तालुका नाखवा संघ सुखावला असून आपल्या मागणीला त्यांच्याकडून निश्चित न्याय मिळेल अशी आशा नाखवा संघाने व्यक्त केली.

यावेळी मुरुड तालुका नाखवा संघाचे मुख्य समनव्यक प्रकाश सरपाटील,  चेअरमन महेंद्र गार्डी, जनार्दन गोवारी, लक्ष्मण मेनदाडकर, जगन्नाथ वाघरे नारायण गोलान, धुरवा लोदी, चेरमन पांडुरंग आगरकर, बबन शेखजी,तहसीलदार गमन गावित, तालुका अध्यक्ष मंगेश दांडेकर, अतिक खतीब, सहायक पोलीस निरीक्षक रंगराव पवार, माजी शहर अध्यक्ष हसमुख जैन आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.