सोशल मीडियावरील बदनामीकारक मेसेजबद्दल अभ्युदय बँकेने दिले स्पष्टीकरण

मुंबई :अज्ञात व्यक्तीद्वारे सोशल मीडियावर खोडसाळपणे केलेल्या बदनामीकारक  मेसेजच्या बाबतीत अभ्युदय बँकेकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. परळ येथील बँकेच्या मुख्यालयात अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांनी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेमध्ये बँकेबद्दल पसरविण्यात येणाऱ्या बदनामीकारक मेसेजबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली.

काही उपद्रवी व्यक्तींद्वारे सोशल मीडियावर बँकेविषयी बिनबुडाचे आरोप करून व खोटी माहिती प्रसारित  करून बँकेची बदनामी केली गेल्याने बँकेने याची गांभीर्याने नोंद घेतली आहे.  अशा खोट्या अफवा पसरविणाऱ्या अज्ञात व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यासाठी पोलिसात तक्रार दाखल केली असल्याचे या पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आले. तसेच सर्व ग्राहकांना अशी विनंती करण्यात आली की, अशा अपप्रचाराकडे दुर्लक्ष करावे. किंबहुना  बँकेचे लाखो ग्राहक, खातेदार व भागधारक अत्यंत सुस्थितीत असून बँकेकडे पर्याप्त भांडवल आहे. बँकेवर विश्वास ठेवावा व अशा खोट्या एसएमएसपासून सावध राहावे, अशी विनंती यावेळी अभ्युदय बँकेकडून करण्यात आली.

या पत्रकार परिषदेसाठी व्यासपीठावर अभ्युदय बँकेचे चेअरमन संदीप घनदाट यांच्यासोबत मानद चेअरमन सिताराम घनदाट,  व्यवस्थापकीय संचालक प्रेमनाथ सालियन व राजीव गांगल हे उपस्थित होते