भिवंडीत मुंबई विद्यापीठाच्या विरोधात विद्यार्थी परिषदेचे भीक मागो आंदोलन

भिवंडी: कोरोना संसर्ग काळात महाविद्यालयीन विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शुल्कामध्ये ३० टक्के कपात करण्यात यावी. ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा झाल्या नाहीत त्यांचे परीक्षा शुल्क परत करावे, विद्यार्थी ज्या सोयीसुविधा वापरत नाहीत त्यांचे शुल्क आकारण्यात येऊ नये तसेच शैक्षणिक शुल्क चार टप्प्यांमध्ये भरण्याची सुविधा विद्यार्थ्यांना द्यावी आदी  मागण्यांसाठी एक महिन्यापासून मुंबई विद्यापीठ व संबंधित प्राधिकरणांकडे निवेदन देऊनसुध्दा प्रशासन विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने अखेर विद्यापीठ प्रशासनाचा निषेध म्हणून अखिल भारतीय विद्यार्थी परिषद भिवंडी महानगराच्यावतीने धामणकर नाका येथे शुक्रवारी दुपारी सामाजिक अंतर नियमांचे पालन करीत भीक मागो आंदोलन केले.
मुंबई विद्यापीठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अक्षरशः आर्थिक लूट करीत आहे व ती त्यांनी लवकरात लवकर थांबवावी असे मत अभाविप भिवंडी महानगर मंत्री ओजस जयवंत यांनी व्यक्त केले. या आंदोलनात ठाणे जिल्हा संयोजक अभिषेक माने, जिल्हा सहसंयोजक राजस जयवंत, जिल्हा एसएफडी प्रमुख कमल उपाध्याय, राकेश पाल, नितीन गुप्ता आदींसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.