नाशिकमध्ये मास्क न वापरणाऱ्या १६ हजार जणांविरुध्द कारवाई

नागरिकांनी नियम पाळून पोलीस आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

नाशिक : शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असतानाही मास्कचा वापर न करता फिरणाऱ्यांविरूध्द शहर पोलीस तसेच प्रशासनाने कारवाई सुरू केली असून शहर परिसरात आतापर्यंत १६ हजार ६९० बेशिस्त वागणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली आहे. टाळेबंदीचे नियम मोडणाऱ्यांविरोधातही कारवाई करण्यात येत आहे. नागरिकांनी नियम पाळून पोलीस तसेच प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

मार्चपासून टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. या काळात कोरोना संसर्ग टाळण्यासाठी मास्कचा वापर करणे अनिवार्य असताना काहीजण त्याचा वापर करायचे टाळत आहेत. त्यांच्या अशा वागण्यामुळे कोरोना संसर्गाचा धोका अधिक वाढत असल्याने अशा मुजोर नागरिकांविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल करणे सुरू केले आहे. आतापर्यंत या अंतर्गत १६ हजार ६९० जणांविरोधात सार्वजनिक ठिकाणी मास्कचा वापर केला नाही म्हणून कारवाई करण्यात आली आहे. तसेच शहर वाहतूक शाखेच्या वतीने मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमा अंतर्गत कारवाई करून एक कोटी, ९० हजार ९०० रुपये दंड आकारण्यात आला. त्यापैकी केवळ २२ लाख, २५ हजार १०० रूपये दंड वसूल करण्यात आला आहे. कोरोनाचा संसर्ग पसरू नये म्हणून पोलीस तसेच महापालिका प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत असल्या तरी त्यांना नागरिकांकडूनही सहकार्य मिळणे आवश्यक आहे. काही बेशिस्त नागरिकांमुळे इतर शिस्तप्रिय नागरिकांनाही कोरोना संसर्गाचा धोका संभवतो. करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी कारण नसताना बाहेर पडू नये, नियमांचे पालन करावे, असे आवाहन शहर पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे.