धुळ्यात स्वस्त धान्य दुकानांवर कारवाई

धुळे:  शिधापत्रिकाधारकांना वेळेवर धान्य न देणे, जास्त किंमतीत धान्य देणे, शिधापत्रिकाधारकांशी उद्धटपणाचे वर्तन करणे, वरीष्ठ अधिकारी तपासणी करीता आले असता अभिलेख उपलब्ध करुन न देणे इत्यादी कारणांमुळे धुळे जिल्हयातील कापडणे ता. धुळे येथील रास्त भाव दुकान क्र. १८८ आणि बोरपाणी ता. शिरपूर येथील रास्त भाव दुकान क्र.१३७ ही दोन दुकानांची मान्यता रद्द करण्यात आली असून कापडणे ता. धुळे येथील रास्त भाव दुकान क्र. ४५ आणि शेवडीपाडा ता. साक्री येथील रास्त भाव दुकान क्र. ८४ हे निलंबीत करण्यात आले. तसेच नवापाडा (ब्रा) ता. साक्री येथील स्वस्त धान्य दुकानाची १००% अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.तसेच गैरप्रकार करन्यावर वचक बसावा म्हणून दुकानदारांना १३००० रुपये चा दंडही करण्यात आला आहे.
जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या तपासणी पथकाने १०जून रोजी मालकातर येथील रास्त भाव दुकानाची अचानक तपासणी केली होती. त्यामध्ये गैरप्रकार आढळुन आल्याने संबंधित स्वस्त धान्य दुकानदार यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हा सांगवी पोलिस स्टेशन ता. शिरपूर येथे नोंदविण्यात आलेला आहे. मालकातर येथील दुकान हे बोरपाणी ता. शिरपूर येथील स्वस्त धान्य दुकानदार  नवलसिंग पाडवी पावरा हे चालवित होते. बोरपाणी येथील दुकानाची तपासणी केली असता त्यातही गैरप्रकार आढळुन आल्याने बोरपाणी येथील स्वस्त धान्य दुकान क्र. १३७  हे रद्य केले आहे.
कापडणे ता. धुळे येथील रेशन दुकानांच्या प्राप्त तक्रारीनुसार जिल्हा पुरवठा अधिकारी, धुळे आणि तहसिलदार धुळे ग्रामीण यांच्या पथकाने गावी अचानक भेट दिली असता अधिकारी गावात आल्याचे कळताच संबधित स्वस्त धान्य दुकानदार दुकान बंद करुन गावातून निघुन गेले. म्हणुन संबधित स्वस्त धान्य दुकान सिल करुन सदर दुकानांची  २४ जुलै रोजी तपासणी करण्यात आली होती. त्यात स्वस्त धान्य दुकान क्र.१८८ रजूबाई पाटील यांनी ५० किलो क्षमतेच्या गोण्यांमध्ये जास्तीचे धान्य भरुन ठेवलेले होते, तसेच अभिलेख तपासणीत आढळुन आलेल्या त्रृटी मध्ये त्यांचा परवाना रद्य करण्यात आलेला आहे. ग्राहकांशी उद्धटपणे बोलणे, अरेरावी करणे, अभिलेख उपलब्ध करुन न देणे, इत्यादी कारणांमुळे  कल्पना बाविस्कर यांचे दुकान क्र.४५ कापडणे ता. धुळे हे माहे ऑगस्ट ते ऑक्टोबर-२०२० या तीन महिन्यांसाठी निलंबीत करण्यात आले आहे.
मार्च २०२० या महिन्यामध्ये मानव अधिकार आयोगाचे केंद्रीय पथक धुळे जिल्हयात दौऱ्यावर आले असता सदर दिवशी मौजे शेवडीपाडा ता. साक्री येथील स्वस्त धान्य दुकानदार सोनीबाई रुपचंद ठाकरे यांनी मुद्यामहुन दुकान बंद ठेवले. गावातील लाभार्थ्यांनी त्यांच्या दुकानाविषयी केलेल्या तक्रारीस अनुसरुन त्यांचे दुकान हे एक महिन्यासाठी निलंबीत करुन त्यांच्या दुकानाची अनामत रक्कम जप्त करुन १०,०००/- रु मात्र दंड ठोठावण्यात आलेला आहे. तसेच साक्री तालुक्यातील नवापाडा (ब्रा) येथील स्वस्त धान्य दुकानातील दोंषाबाबत चौकशी करून त्यांच्या दुकानाची संपुर्ण अनामत रक्कम जप्त करण्यात आली आहे.
धुळे जिल्हयातील सर्व रास्त भाव दुकानदार यांना याव्दारे आवाहन करण्यात येते की, लाभार्थ्यांना शासकीय नियमाप्रमाणे वेळीच धान्याचे वाटप करावे, कोणताही लाभार्थी धान्यापासून वंचीत राहणार नाही, व लाभर्थ्यांची तक्रार प्राप्त होणार नाही याबद्दल दक्षता घेण्याच्या सुचना जिल्हा पुरवठा अधिकारी धुळे यांनी दिलेल्या आहेत.