महाडमधील अतिधोकादायक ‘अल कासिम’ इमारतीवर नगर परिषदेची कारवाई

महाड : महाड(mahad) शहरातील छत्रपती शिवाजी मार्गावरील ‘अल कासिम’(al quasim) ही इमारत अतिधोकादायक व प्रतिबंधित क्षेत्र म्हणून नगर परिषदेने घोषित केली असून या इमारतीमधील सर्व रहिवाशांना त्यांच्या सदनिका सोडण्याच्या सूचना महाड नगरपरिषदेने दिल्या आहेत. या इमारतीवर उद्या महाड नगर परिषदेकडून कारवाई करण्यात येणार असून इमारत सील करण्यात येणार आहे .
सर्वे नंबर १९१/१ ए या जागेवर १९९७ साली विकासक मेहबुब कडवेकर यांनी त्यांच्या मालकीच्या जागेत २९ सदनिकांची ही इमारत बांधली होती. ही इमारत धोकादायक असल्याच्या तक्रारी या इमारतीतील रहिवाशांनी नगर परिषदेत केल्यानंतर या इमारतीचे स्ट्रक्चरल ॲाडीट करण्याबाबत सुचना देण्यात आली होती . मात्र स्ट्रक्चरल ॲाडीट अहवाल नगर परिषदेला प्राप्त झाल्यानंतर ही इमारत अतिधोकादायक असल्याचे स्पष्ट झाले व या इमारतीमधील सर्व रहिवाशांना सदनिका रिकाम्या करण्याच्या व रहिवासी वापर बंद करण्याबाबत नोटीस नगर परिषदेने ११ ॲागस्ट रोजी दिली होती.
तारिक गार्डन(tarique garden) इमारत दुर्घटनेची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी नगर परिषदेने आता याबाबत कठोर कारवाईची पावले उचलली असून आज गुरुवारी सकाळी आठ वाजता ही ‘अल कासिम’ इमारत सील करण्याची कारवाई मुख्याधिकारी जीवन पाटील , नगर अभियंता सुहास कांबळे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस बंदोबस्तात करण्यात येणार आहे . दरम्यान या इमारतीमधील सर्व सदनिका रिकाम्या करण्यात आल्या असल्याची माहिती मिळाली आहे. महाराष्ट्र नग रपरिषदा, नगर पंचायती , औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ च्या कलम १९५ नुसार ही कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी दिली.

ही अतिधोकादायक इमारत संबंधित भोगवटाधारकांकडून अथवा विकासकाकडून स्वखर्चाने जमीनदोस्त करण्याबाबतच्या सुचनाही देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले . तारीक गार्डन इमारत दुर्घटेनंतर शहरातील धोकादायक बनलेल्या अनेक इमारतींमधील रहिवाशांनी आपल्या इमारतीच्या निकृष्ट बांधकामाबाबत विकासकांच्या विरोधात तक्रारी केल्या असून याबाबत नगरपरिषदेकडून गंभिर दखल घेतली जाणार असल्याचे मुख्याधिकारी जीवन पाटील यांनी स्पष्ट केले .