कोमलच्या निधनानंतर उदयनराजेंनी फेसबुक पोस्टद्वारे व्यक्त केल्या भावना

अवयवदानासाठी काम करणाऱ्या साताऱ्यामधील कोमल पवार – गोडसेचे(komal pawar godse) आज निधन झाले. ही बातमी समजल्यानंतर खासदार छत्रपती उदयनराजे भोसले(udayanraje bhosale) यांनी कोमलसंदर्भात एक पोस्ट शेअर केली आहे. कोमलचं जाणं फक्त सातारकरांसाठी नाही तर सगळ्या महाराष्ट्रासाठीची वाईट बातमी असल्याचे उदयनराजे भोसले यांनी म्हटले आहे.

उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये असे म्हटले आहे की, “सातारा शहराला अभिमान असलेला हसरा चेहरा कोमल पवार – गोडसे हीला २०१७ साली ‘प्लमोनरी हायपरटेन्शन’ या व्याधीचे निदान झाले आणि तिचे आयुष्य जणू तिथेच स्तब्ध झाले. पण तिने व तिच्या पतीने धीर सोडला नाही आणि ती मृत्यूच्या दाढेतून बाहेर आली आणि कोमल ठरली होती महाराष्ट्रातील पहिली दोन्ही फुफ्फुस आणि हृदय प्रत्यारोपण झालेली व्यक्ती. पण ३ दिवसांपूर्वी कोमलचा आजार अचानक वाढल्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार  तिला ताबडतोब हैदराबाद येथे शिफ्ट करण्यात आले.मात्र आज पहाटे कोमल आपल्यात न राहिल्याची बातमी समजली आणि धक्का बसला.
त्यांनी पुढे असे म्हटले आहे की, कोमल आणि तिचे पती धिरज दोघांनी ‘कोमल न्यू लाईफ फाउंडेशन’ या संस्थेची स्थापना केली होती, त्यामार्फत त्यांनी ऑर्गन डोनेशनसाठी खूप मोठं काम केलं तसेच गरजूंना वाटेल ती मदत, जनजागृती केली. स्वभावाने अत्यंत प्रेमळ, मनमिळावू, हसतमुख अश्या कोमल ला “सातारा” नेहमी स्मरणात ठेवेल. माझ्या अगदी लहान बहिणीप्रमाणे असलेल्या कोमलला भावपूर्ण श्रद्धांजली”.

कोमलच्या जाण्याने भावूक होऊन उदयनराजेंनी ही पोस्ट लिहिली आहे.