अकलोली ग्रामस्थांची लाॅजिंग,गेस्ट हाऊस बंद करण्याची मागणी

भिवंडी : तालुक्यातील वज्रेश्वरी देवस्थान असलेल्या भागातील अकलोली गाव येथील अकलोली कुंड परिसरातील लाॅजिंग व गेस्ट हाऊस सुरु असल्याने या भागामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे तेथील ग्रामस्थांनी एकत्रित येऊन लाॅजिंग व गेस्ट हाऊस बंद करण्याची मागणी तहसिलदार शशिकांत गायकवाड यांच्याकडे निवदेनाद्वारे केली आहे.

कोविड-१९ सारख्या महामारीने कोरोना रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. लॉकडाऊन काळात शासनाने प्रसारीत केलेल्या नियमांचे व निर्देशाचे पालन ग्रामस्थांकडून होत आहे. मात्र लाॅजिंग व गेस्ट हाऊसचा बहुतांश ग्राहक वर्ग वसई-विरार, मुंबई, ठाणे, भिवंडी, नालासोपारा इत्यादी कोरोनाग्रस्त रेड झोनमधील असल्याने लाॅजिंग  व गेस्ट हाऊस सुरु झाल्याने कोरोना रोगाचा प्रसार वाढणार असल्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकलोली  उपसरपंच योगेश पाटील, विकास पाटील, यतिन पाटील, चंद्रकांत पांढरे, अमित राऊत तसेच महिला मंडळ व ग्रामस्थांनी लाॅजिंग बोर्डींग व गेस्ट हाऊस बंद करण्याची मागणी केली आहे. याच्यावर लवकरात लवकर प्रशासनाने निर्णय घेतला नाही तर ग्रामस्थांकडून आंदोलनाचा इशारादेखील देण्यात आला आहे.