court

लव्ह जिहादवरून वातावरण तापलेले असताना अलाहाबाद हायकोर्टाने महत्वाचा निर्णय घेतला आहे. उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील सलमान अन्सारी यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला आहे.

अलाहाबाद: उत्तर प्रदेशचे योगी आदित्यनाथ सरकार लव्ह जिहादबाबत(love jihad) कायदा करण्याच्या तयारीत आहे. या दरम्यानच, अलाहाबाद उच्च न्यायालयाने(Allahabad high court) उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील सलमान अन्सारी यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर फेटाळून लावला आहे.

याबद्दल न्यायालयाने म्हटले आहे की, वैयक्तिक नातेसंबंधात हस्तक्षेप करणे हे दोन लोकांच्या स्वातंत्र्यावर गदा आहे. न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले की कायद्यानुसार कोणत्याही व्यक्तीला त्यांच्या पसंतीची व्यक्तीसोबत एकत्र राहण्याची परवानगी आहे, मग तो समानधर्मीय असेल किंवा वेगळ्या धर्माचा असेल. या प्रकरणाकडे आम्ही हिंदू – मुस्लिम या दृष्टिकोनातून बघत नाही, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

प्रियांका खरवार आणि सलमान अन्सारी यांच्याकडे हिंदू -मुस्लिम म्हणून आम्ही पाहत नाही. याउलट ते आपल्या मर्जीने आणि पसंतीनुसार एक वर्षापेक्षा अधिक कालावधीपासून आनंदाने आणि शांततेने जीवन व्यतीत करीत आहेत. घटनेतील कलम २१ नुसार व्यक्तीला प्रदान केलेल्या अधिकारांच्या दायित्वाचे संरक्षण करण्याची जबाबदारी न्यायालयाची आहे, असे हायकोर्टाने म्हटले आहे.

प्रियांकाने स्वत:च्या मर्जीने केले धर्मांतर

उत्तर प्रदेशातील कुशीनगर येथील रहिवासी सलमान अन्सारी आणि प्रियांका खरबार यांनी आपल्या कुटुंबाच्या इच्छेविरुद्ध जाऊन मागील वर्षी ऑगस्टमध्ये लग्न केले. लग्नापूर्वी प्रियांकाने इस्लाम धर्मात प्रवेश केला होता आणि तिने स्वतःचे नाव बदलून आलिया केले होते. प्रियांकाच्या कुटुंबीयांनी सलमानवर ‘अपहरण’ आणि लग्नासाठी फूस लावल्याचा आरोप लावून एफआयआर दाखल केला होता. पोक्सो कायद्याचाही एफआयआरमध्ये समावेश करण्यात आला होता. प्रियांकाच्या कुटुंबियांनी दावा केला होता की, लग्नावेळेस त्यांची मुलगी अल्पवयीन होती.

सलमानने त्यांच्याविरुद्ध दाखल केलेला एफआयआर रद्द करण्याची विनंती करणारी याचिका दाखल केली होती.  याचिकेवर सुनावणी देताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने ११ नोव्हेंबरला रोजी निकाल दिला होता. उत्तर प्रदेश  सरकार आणि प्रियांकाच्या कुटुंबीयांचा युक्तिवाद फेटाळून लावत उच्च न्यायालयाने १४ पानी आदेशात म्हटले, आपल्या पसंतीच्या व्यक्तीबरोबर जीवन जगणे हा प्रत्येक व्यक्तीच्या जीवनाच्या आणि वैयक्तिक स्वातंत्र्याचा मूलभूत भाग आहे.