अन् फडणवीस म्हणाले, हा असंवेदनशीलतेचा कळस…

राज्यात कोव्हिड सेंटर आणि इतर ठिकाणीसुद्धा महिला अत्याचाराच्या घटना वाढत आहेत. महिला सुरक्षेच्या(women safety) प्रश्नाकडे राज्य सरकार दुर्लक्ष करत आहे, असा आरोप विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस(devendra fadanvis) यांनी केला आहे.  सरकारने हा विषय गांभीर्याने घ्यावा, उपाययोजना कराव्यात. कोव्हिड आणि क्वारंटाईन केंद्रात महिला सुरक्षेचे एसओपी तातडीने तयार करावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. या मागणीचे पत्र(letter) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(uddhav thakre) यांच्याकडे फडणवीसांनी पाठवले आहे.

महिला सुरक्षेसाठी एसओपी तयार करण्यासंदर्भात याआधीही पत्र पाठवले होते. मात्र काहीही कारवाई करण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा पत्र पाठवल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. ते पुढे पत्रात म्हणतात की, इतर विषयांवर हिरीरीने बोलणारे या विषयावर निषेध करतानासुद्धा दिसत नाहीत. हा असंवेदनशीलतेचा हा कळस आहे.

पुढे ते म्हणतात की, यावर्षी फेब्रुवारीमध्ये स्त्रियांना जाळून मारण्याच्या किमान सात घटना घडल्या होत्या. पुढे दिशा कायद्याची चर्चा झाली. कालांतराने तो प्रस्ताव मागे पडला. पनवेल, पेण , इचलकरंजी, नंदूरबार, चंद्रपूर, मालाड येथे क्वारंटाईन सेंटरमध्ये विनयभंगाच्या आणि बलात्काराच्या घटना घडल्या. मिरा-भाईंदर येथील कोविड सेंटरमध्ये महिलेवर बलात्कार, मानखुर्दला अल्पवयीन मुलीचा विनयभंग, बडनेरा लॅबमध्ये महिलेच्या गुप्तांगाचा स्वॅब अशा अनेक घटना यापूर्वीच्या पत्रात सांगितल्या होत्या. वारंवार घडणाऱ्या या घटना पाहता तातडीने कोव्हिड सेंटर्सबाबत एसओपी तयार करण्याची गरज आहे. महिला अत्याचाराच्या घटना कमी करण्यासाठी स्थानिक पातळीवर प्रशासन संवेदनशील असले पाहिजे. या घटनांकडे आपण गांभीर्याने लक्ष द्याल आणि आवश्यक त्या उपाययोजना कराल, असे फडणवीसांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात म्हटले आहे.