मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाण निष्क्रीय – आमदार मेटे यांचा आरोप

पेण :शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे हे रायगड जिल्ह्यावर तांबडी येथील आपला दौरा आटपून पेणचे शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष आप्पा सत्वे यांच्या घरी आले होते. यावेळी मराठा समिती आंदोलन छेडणार असे त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हे सरकार मराठा आरक्षणाबद्दल उदासीन व निष्काळजी असल्याचे त्यांनी पत्रकारांना सांगितले.

ते पुढे म्हणाले की, मराठा आरक्षणावर गठीत राज्य मंत्रिमंडळाच्या उपसमिती अध्यक्षपदावरून राज्य सरकारने मंत्री अशोक चव्हाण यांना हटविण्याची मागणी आमच्या संघटनेमार्फत केली आहे. मराठा आरक्षणाबद्दल अशोक चव्हाण हे पूर्णपणे निष्क्रिय असल्याने त्यांना या पदावरून तात्काळ हटवण्याची मागणी सरकारकडे करण्यात आली आहे. आमदार मेटे यांनी पुढे सांगितले. सरकारने उपसमिती अध्यक्षपदी कोणीतरी चांगले मंत्री  बसवावेत, असेही ते म्हणाले.

आमदार मेटे यांनी पुढे सांगितले की अशोक चव्हाण आपली खुर्ची टिकवण्यासाठी आपल्या आपल्या पसंतीच्या सचिव व अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यासाठी धडपडत आहेत. मराठा आरक्षणावर त्यांचे लक्ष नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अशोक चव्हाण राज्यात कुठेही दौरा करतील तेव्हा त्यांच्या विरोधात मराठा समाज शिवसंग्राम संघटना आंदोलन करतील .त्यांनी पुढे सांगितले की सुप्रीम कोर्टात यासंदर्भात सुनावणी सुरू असून या सरकारने जेवढी तयारी करावयाची गरज असताना तेवढी केलेली नाही. सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षणाबद्दल सरकार मार्फत मराठा आरक्षणासंदर्भात ज्या वकिलांची आता नियुक्ती केली जात आहे. त्या वकीलांमध्ये ताळमेळ असल्याचे दिसून येत नसून सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण संदर्भात निवेदन सादर करावयाचे होते ते सोडून आरक्षणाबद्दल गरज नसलेली कागदपत्र हे वकील कोर्टात सादर करीत आहेत. आम्हाला मराठा आरक्षणा संदर्भात या सरकारवर शंका येते. शिवसंग्राम  संघटनेने स्वतःच्या खर्चाने नेमलेले जुन्या वकिलांची टीम परत नियुक्ती करण्याची मागणीही त्यांनी सरकारकडे केली आहे. याबाबत सरकार बघ्याची भूमिका घेत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

या सरकारकडे दूरदृष्टी नसल्यामुळे मराठा आरक्षणाबद्दल नोकऱ्यांमध्ये सुरू असलेली भरती थांबवण्यात आली आहे. अशीच स्थिती राहिली तर पुढे त्याचे परिणाम चांगले होणार नाहीत. यासाठी अशोक चव्हाण यांना या समितीवरून तात्काळ हटवले पाहिजे. माजी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मागचे सरकार असताना सर्वांचा समन्वय ठेवला होता. आताच्या सरकारमध्ये समन्वय नसल्याचे मेटे म्हणाले.