अखेर पेणमधल्या ‘त्या’ आदिवासी वाडीचे सगळे प्रश्न सुटणार

पेण: आपल्यालाही विकासाच्या वाटा दिसतील आणि आपलाही विकास होईल या आशेने आदिवासी वाडीची वस्तुस्थिती पाहायला आलेल्या अधिकाऱ्यांसमोर पारंपारिक नृत्य करून कोरळवाडीतील आदिवासींनी स्वागत केले. स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच आपल्या वाडीतील रस्ता, पाणी आणि शिक्षणाचा प्रश्न कायमचा सुटणार या आशेने कोरलवाडीतील आदिवासींनी आपले पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करून प्रशासनाचे आभार मानले.

गेल्या काही महिन्यापासून ग्राम संवर्धन सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली या वाडीतील ग्रामस्थांनी शासन दरबारी आपला प्रश्न सातत्याने मांडण्याचा प्रयत्न केला. वाडीला मूलभूत सुविधा पुरवणे ही शासनाची जबाबदारी आहे आणि आदिवासींचा तो हक्कही आहे. मात्र कोरळवाडीला जोडणाऱ्या रस्त्याला वनविभागाची परवानगी मिळाल्याशिवाय हा रस्ता करता येणार नाही ही मोठी अडचण संतोष ठाकूर यांनी शासनाच्या लक्षात आणून दिली. यासाठी ९ ऑगस्ट ‘जागतिक आदिवासी दिना’ पासून कोरलावाडीतील आदिवासी बांधवांसोबत पनवेलमधील उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण करण्यात आले. अखेर याची दखल घेत संबंधित सर्व यंत्रणांनी एकत्रित  बैठक घेऊन कोरळवाडीला प्रत्यक्ष स्थळ पाहणी भेट करण्याचे सर्व निर्देश एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांनी दिले होते.

कोरळवाडी स्थळ पाहणीसाठी १८ ऑगस्टला विविध अधिकारी आले होते. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी शशिकला अहिरराव यांच्यासह महसूल विभागाचे मंडळ अधिकारी, पेण वनविभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी गायकवाड , पनवेल वनपरिक्षेत्र अधिकारी सोनावणे, वनक्षेत्रपाल कांबळे, वन संरक्षक कदम, आनंद खाने, पनवेल पंचायत समिती सहाय्यक गटविकास अधिकारी लता मोहिते रायगड जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभागाचे अभियंता कांबळे, रायगड जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे अभियंता संदेश पाटील, रायगड जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर घरत,पंचायत समिती सदस्या तनुजा टेंभे, आपटा ग्रामपंचायतीचे सरपंच भोईर पनवेल पंचायत समिती गट शिक्षणाधिकारी साबळे, आपटा मंडळ अधिकारी मनीष जोशी,पनवेल तालुका भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी दीपक ढवळे, सामाजिक कार्यकर्त्या नंदा म्हात्रे आणि कोरळवाडी आदिवासी वाडीचे ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 जंगलातील ज्या वाटेने हे आदिवासी बांधव पिढ्यानपिढ्या मार्गक्रमण करत असतात त्या वाटेतून  हे सर्व अधिकारी स्वतःला सावरत असताना वाडीतील महिला पुरुषांनी स्वतःच्या हाताला धरून आधार देत  वाडीपर्यंत पोहचताच आलेल्या पाहुण्यांना जंगलातील फुलापानांचे पुष्पगुच्छ देत त्याच्यासमोर आपले पारंपारिक आदिवासी नृत्य सादर करून स्वागत केले. नंतर सर्व अधिकारी वर्गाला आपल्या वाडीभोवती फिरवून नागरिकांनी समस्यांचं गाऱ्हाणे मांडले शेवटी प्रकल्प अधिकारी अहिरराव यांनी  सर्व अधिकारी व पदाधिकाऱ्यांना २१ ऑगस्ट रोजी पनवेल उपविभागीय अधिकारी दत्तात्रय नवले यांच्या दालनात होणाऱ्या आढावा बैठकीत येताना आपापले दस्तावेज सोबत घेऊन येण्याच्या सूचना दिल्या. वाडीतील सर्व कार्यक्रमाचे व्यवस्थापन गुरुदास वाघे,संतोष पवार,भानुदास पवार हरिश्चंद्र वाघे,लक्ष्मण पवार,बेबी राम वाघे,रमेश वाघे,राम बयाजी वाघे, हरिश्चंद्र वाघे यांच्यासह ग्राम संवर्धनचे कार्यकर्ते राजेश रसाळ,सामाजिक कार्यकर्ते रत्नाकर घरत व कोरलवाडी ग्रामस्थानी उत्कृष्ट पद्धतीने केल्याबद्दल गटशिक्षण अधिकारी साबळे यांनी आनंद व्यक्त केला.