शिक्षण विभागाविरोधात आंदोलन करण्याची सभापतींवर ओढवली नामुष्की

मुरबाड: मुरबाड(murbad) तालुक्यात व पंचायत समितीत सर्वत्र वर्चस्व असतानाही गट शिक्षण अधिकारी मिळावा म्हणून पंचायत समितीचे सभापती श्रीकांत धुमाळ यांच्यावर आज स्वतःच्याच कार्यालयाविरोधात निषेध आंदोलन(protest) करण्याची नामुष्की ओढवली.

मुरबाड तालुक्यातील शिक्षण विभागाला(education department) गेली दीड ते दोन वर्ष गटशिक्षण अधिकाऱ्याच्या खुर्चीला शोभेल असा ‘कुवतीचा’ गट शिक्षण अधिकारी मिळाला नाही. आतापर्यंत सर्व गट शिक्षण अधिकाऱ्यांची नेमणूक ही प्रभारी झाली आहे.पदाचा अतिरिक्त भार आणि हे पद पेलवण्याची ‘क्षमता’ नसलेल्या अनेकांच्या खांद्यावर हे ‘ओझे’ दिल्याने मुरबाडच्या शिक्षण विभागाचा वेळोवेळी बोजवारा उडाला.पंचायत समितीचा सर्वानुमते ठराव घेऊन ठाणे जिल्हा परिषदकडे मागणी लाऊन धरल्यास कायमस्वरूपी गटशिक्षण अधिकारी मिळणे अवघड नाही, मात्र आजपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या ‘डाव्या हाताचा मळ असणाऱ्या’ या विषयाला मार्गी लावणे सत्ताधाऱ्यांना जमले नाही.

सध्या शिक्षण विभागाचा पदभार हा शिक्षण विस्तार अधिकारी असलेल्या के.एस.खरपडे यांच्यावर सोपवला आहे. त्या गेले पंधरा दिवस रजेवर असल्याने मुरबाडचा शिक्षण विभाग सध्या ‘निराधार’ आहे. अजूनही दहा दिवस त्या हजर होणार नाहीत. त्यामुळे आधीच कोविड काळात तालुक्यातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याचे काय निर्णय घ्यावेत, याबाबत गोंधळात असताना तोंडावर आलेला शिक्षक दिन कसा साजरा करायचा, याबाबत नवनिर्वाचित पंचायत समिती सभापती श्रीकांत धुमाळ हे अधिकच गोंधळले आहेत. त्यामुळे शिक्षक दिनाआधी खरपडे यांना कामावर रुजू करावे किंवा नवीन गट शिक्षण अधिकारी नेमावा, अशी मागणी ठाणे जिल्हा परिषदकडे करत धुमाळ यांनी गट शिक्षण अधिकारी खरपडे यांच्या रिकाम्या खुर्चीला हार घालून निषेध नोंदवला.

सत्ताधारी असूनही स्वतःच्याच कार्यालयातील शिक्षण विभागाच्या भोंगळ कारभाराविरोधात आंदोलन करण्याची नामुष्की जरी धुमाळ यांच्यावर ओढावली असली तरी त्यांच्या या आंदोलनामुळे किमान मुरबाडच्या शिक्षण विभागाला कायमस्वरूपी गट शिक्षण अधिकारी मिळो, अशी भावना मुरबाडकर व्यक्त करत आहेत.