भिवंडीतील बाई गुलबाई पेटिट रुग्णालयाचे भूमिपूजन संपन्न 

भिवंडी : भिवंडी शहरातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या परंतु मागील दहा वर्षांपासून इमारत धोकादायक झाल्याने बंद करण्यात आलेल्या बाई गुलबाई पेटिट रुग्णालयाच्या उभारणीसाठी राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर केल्याने स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून या नव्या रुग्णालय इमारतीचे भूमिपूजन महापौर प्रतिभा पाटील यांच्या हस्ते  करण्यात आले. यावेळी खासदार कपिल पाटील ,आमदार महेश चौघुले नगरसेविका रिषिका प्रदीप रक्त ,आयुक्त डॉ पंकज आशिया ,अतिरीक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे आदींच्या उपस्थितीत पार पडला.

 भिवंडी महानगरपालिका क्षेत्रातील एकमेव स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती उपजिल्हा रुग्णालय शासनाकडे सुपूर्द केल्यानंतर महानगरपालिकेचे स्वतंत्र रुग्णालय नसल्याने नागरीकांची रुग्णसेवेअभावी हेळसांड होत असल्याने महानगरपालिका लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून राज्य शासनाकडे पाठपुरावा केल्याने हे अद्ययावत रुग्णालय पुन्हा नव्याने नागरिकांच्या सेवेत येणार असल्याबद्दल महापौर प्रतिभा पाटील यांनी आनंद व्यक्त करीत नागरीकांना सुसज्य आरोग्य सेवा देण्यासाठी महानगरपालिका सज्ज असल्याबद्दल समाधान व्यक्त केल . खासदार कपिल पाटील यांनी बाई गुलबाई पेटिट रुग्णालयाच्या जुन्या आठवणींना उजाळा देत हे रुग्णालय महाराष्ट्रातील इतर महानगरपालिकांसाठी पथदर्शक ठरावा अशा शुभेच्छा दिल्या.आमदार महेश चौघुले स्थानिक नगरसेविका रिषिका  राका यांची ही समयोचित भाषणे झाले .

शहरातील सुमारे शंभर वर्ष जुने रुग्णालय उभारण्यासाठी बाई गुलबाई पेटिट या विश्वस्त संस्थेने जमीन उपलब्ध करून दिली होती तर अब्दुल हाजी समद शेठ यांनी देणगी दिली होती. तत्कालीन नगरपरिषद व नगरपालिका काळात हे रुग्णालय भिवंडीकर नागरीकांच्या सेवेत होते. मात्र कालांतराने स्वर्गीय इंदिरा गांधी स्मृती रुग्णालय उभारल्याने हे रुग्णालय अडगळीत पडून पुढे ते बंद पडले होते . सध्या महानगरपालिकेचे रुग्णालय नसल्याने ती गरज ओळखून शासनाकडे पाठपुरावा केल्यानंतर हे अद्ययावत रुग्णालय उभे राहत असून या माध्यमातून भिवंडीकर नागरीकांना आरोग्य सेवा मिळणार आहे . या प्रसंगी स्थायी समिती सभापती हलीम अन्सारी ,सभागृह नेता विलास पाटील , नगरसेवक संतोष शेट्टी ,सुमित पाटील,तलाह मोमीन ,डॉ जुबेर अन्सारी, रिषिका प्रदीप राका आदी मान्यवर महानगरपालिका अधिकारी उपस्थित होते .