महाडमध्ये शांततेत बाप्पाचे विसर्जन

महाड: कोरोनामुळे यंदा गणेशोत्सव अत्यंत साध्या पद्धतीने वरूण राजाच्या कृपा आशिर्वादाने पार पडला. आज अनंत चतुर्दशीला लाडक्या गणपती बाप्पाचे ‘गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या’, अशा गजरात शांततेत तेवढ्याच भक्तिभावांत विसर्जन करण्यात आले.

यावर्षी संपूर्ण जगावरच कोरोना महामारीच संकंट ओढवल्याने भारतात सहा महिन्यापासून लॉकडाऊन सुरु आहे. यामुळे सर्वच सण उत्सव रद्द करण्यात आले होते. मात्र गणपती उत्सव मात्र काही अटी नियमात साजरा करण्यात आला. हा महत्वाचा उत्सव गणेशभक्तांना दहा दिवस आंनद देवून गेला. यातून आता लाडक्या बाप्पाच्या कृपेने कोरोना महामारीचेसुद्धा विसर्जन होईल, असा विश्वास गणेश भक्तांमध्ये दिसून आला.
आज विसर्जन करण्यात आलेल्या गणपतीमध्ये शहरातील घरगुती आणि सार्वजनिक गणपतीचा समावेश होता. कोणतेही वाद्य, मिरणूक गुलाल आदीचा यामध्ये समावेश नव्हता. शेकडो वर्षात असे चित्र पहिल्यांदाच पाहायला मिळाले आहे.

दहा दिवसांच्या गणपती विसर्जनाकरिता महाड नगरपालिकेच्या वतीने सर्व तऱ्हेची तयारी करण्यात आली होती. सावित्री नदीवरील स्नेहा सोसायटी, जुने हॉस्पिटल, भोईघाट , गवळ आळी आदी घाटावर तयारी होती. विसर्जन शांततेत सुरक्षित आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक सणस त्यांचा पोलीस फौज फाटा सर्वत्र तैनात होता. तसेच विसर्जनावेळी कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी जलतरणपटूदेखील तैनात होते. गणपती बाप्पा मोरया पुढल्या वर्षी लवकर याच्या गजरात साश्रू नयनांनी लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

शासनाच्या स्वच्छ सर्वेक्षण २०२० अभियानात महाड नगर परिषदेने राष्ट्रीय पातळीवर पश्चिम विभागांमध्ये १३ वा क्रमांक, महाराष्ट्रात बारावा क्रमांक तर कोकण विभागात प्रथम क्रमांक पटकावून या स्वच्छता अभियानात सलग तिसऱ्या वर्षी दमदार कामगिरी केली. आज विसर्जन घाटावर नगर परिषदेमार्फत निर्माल्य कलश ठेवले होते स्वयंसेवकांकडून ते निर्माल्य स्वीकारले जात होते.

शहरामध्ये कोठेही अनुचित प्रकार न घडता गणरायाचे शांततेत व नियमानुसार विसर्जन झाले असून गणेशभक्तांनी केलेल्या सहकार्यामुळे पोलिसांवरील बंदोबस्ताचा ताण कमी झाला होता. यासाठी सर्व मंडळीचे कौतुक आणि धन्यवाद.
                                                                                                                            – शैलेश सणस ,पोलीस निरीक्षक