बारवी प्रकल्पग्रस्तांचे तहसीलदार कार्यालयासमोर उपोषण

मुरबाड: मोठा गाजावाजा करून बारवी धरण प्रकल्पग्रस्तांचे शंभर टक्के पुनर्वसन झाल्याचा दावा मागील काही दिवसांपासून केला जात होता. मात्र हा दावा पूर्णतः खोटा ठरला आहे. या प्रकल्पग्रस्तांचा पुनर्वसनाचा प्रश्न कायम असून शेकडो संतप्त प्रकल्पग्रस्तांनी मुरबाड तहसीलदार कार्यालयावर धडक देत कार्यालयासमोर उपोषण  केले.

बारवी धरणाची उंची वाढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. मात्र यात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांच्या अनेक मागण्या पूर्णपणे मार्गी लागल्या नाहीत. त्यातच उंचीवाढीमुळे धरणाचे पाणी शेतकऱ्यांच्या संपादित न केलेल्या जमिनीत घुसले आहे. आधीच पुनर्वसनात चालढकल होत असताना,गावठाण क्षेत्रात आवश्यक सुविधाही पुरवल्या गेल्या नाहीत.  त्यामुळे बारवी धरण प्रकल्प पिडीत सेवा संघाचे कमलाकर भोईर, चंद्रकांत बोष्टे, हरेष पुरोहित, दीपक भोईर आदींच्या नेतृत्वाखाली आज शेकडो बाधित शेतकरी उपोषणाला बसले.

प्रकल्प पिडीतांना एमआयडीसीने अद्यापही नोकरीची नियुक्तीपत्रे दिली नाहीत. त्यांना त्वरित नोकरी देण्यात यावी. सर्व पीडितांना सरसकट खावटी मिळावी. अनेक घरांचे मोबदले दिले गेले नाहीत ते मिळावेत. शेतघरांचे मूल्यांकन करावे. तसेच सध्या धरणाच्या उंचीवाढीमुळे ज्या ठिकाणी पाणी भरले आहे. असे संपादित न केलेले भूखंड संपादित करून त्यावरील पिके, झाडोऱ्याचे मूल्यांकन करून मोबदला द्यावा.दिलेल्या गावठाणात सामाईक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.