पेणमध्ये भाजपच्या घंटानाद आंदोलनात घंटाच गायब

पेण: भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित घंटानाद आंदोलनात घंटाच गायब असल्याचा प्रकार पेण येथे घडला आहे. त्यामुळे पेण येथे आयोजित आंदोलनाची हवाच निघून गेल्याचे चित्र पहावयास मिळाले. यावेळी घंटा उपलब्ध न झाल्याने अखेर देवघरातील घंटी वाजवून व टाळ्या पिटून काम भागवण्याची वेळ पेणमध्ये भाजप कार्यकर्त्यांवर आली. कोरोनाचा संसर्ग व प्रसार टाळण्याकरिता शासनाने मंदिरे बंद करण्याचा निर्णय घेतला. मात्र या निर्णयाला विरोध करण्याकरिता भारतीय जनता पार्टीच्या वतीने राज्यभर घंटानाद आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर पेण येथील गोटेश्वर मंदिराच्या प्रांगणात या आंदोलनाचे आयोजन करण्यात आलेे होते. घंटानाद कार्यक्रमात भाजपाचे आमदार रवीशेठ पाटील हे आलेच नाहीत. या घंटानाद कार्यक्रमात बंडूशेठ खंडागळे व मोजकेच पदाधिकारी व कार्यकर्ते हजर होते.
सकाळपासून पडणाऱ्या पावसामुळे या आंदोलनाला ठराविक मोजक्या कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. यावेळी नियोजनाचा अभाव स्पष्ट दिसून आला. घंटानाद आंदोलनाकरिता घंटाच उपलब्ध झाली नाही. अखेर या कार्यकर्त्यांनी घंटी वाजवून व टाळ्या पिटून आंदोलनाचे सोपस्कर उरकले.या आंदोलनाचा बार फुसका ठरणार याची कल्पना आयोजकांना अगोदर आल्यामुळेच शहर पदाधिकाऱ्यांनी पत्रकारांना या कार्यक्रमाचे आमंत्रण देण्याचे टाळले असल्याचे समजते.