आरटीई प्रवेशाला राज्यामध्ये उत्तम प्रतिसाद,१३ दिवसांत करण्यात आले १ लाख ३६ हजारपेक्षा अधिक अर्ज

आरटीई प्रवेशाला(RTE Admission) ३ मार्चला राज्यभरात सुरुवात झाली.१३ दिवसांमध्ये राज्यामध्ये तब्बल १ लाख ३६ हजार ६६१ अर्ज प्राप्त झाले आहेत.

  मुंबई : आरटीई प्रवेशाला(RTE Admission) ३ मार्चला राज्यभरात सुरुवात झाली. अवघ्या पंधरा दिवसांमध्ये पालकांनी आरटीई प्रवेशाला भरभरुन प्रतिसाद दिला आहे. १३ दिवसांमध्ये राज्यामध्ये तब्बल १ लाख ३६ हजार ६६१ अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यामुळे आरटीई प्रवेश प्रक्रियेतून प्रवेश घेण्याकडे पालक अधिकाधिक वळत आहेत, हे स्पष्ट होते. आरटीई प्रवेशासाठी सर्वाधिक अर्ज पुण्यातून आले आहेत. त्याखालोखाल नागपूर व ठाणे जिल्ह्यातून अर्ज आले आहेत.

  बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा अधिकारांतर्गत खासगी विनाअनुदानित शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा वंचित दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी राखीव ठेवण्यात येतात. या जागांसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला ३ मार्चपासून सुरुवात झाली. त्यासाठी पालकांना https://rte25admission.maharashtra.gov.in आणि https://student.maharashtra.gov.in या संकेतस्थळावरून अर्ज भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

  आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ९४३१ शाळांमध्ये ९६ हजार ८०१ जागा
  आरटीई प्रवेशासाठी संपूर्ण राज्यातून ९४३१ शाळांमध्ये ९६ हजार ८०१ जागा आहेत. मात्र अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस सुरुवात झाल्यानंतर अवघ्या १३ दिवसांतच राज्यभरातून आरटीई प्रवेशासाठी तब्बल १ लाख ३६ हजार ६६१ अर्ज आले. आरटीई अंतर्गत असलेल्या जागांच्या तुलनेत अधिक अर्ज आल्याने आरटीई प्रवेशासाठी चुरस निर्माण झाली आहे. यामध्ये पुण्यातून सर्वाधिक ३६ हजार ७१४ अर्ज आले आहेत. त्याखालोखाल नागपूरमधून १६ हजार ९४६, ठाणे ११ हजार ५३३, नाशिक ८०९७ अर्ज आले आहेत तर सर्वाधिक कमी अर्ज सिंधुदर्ग जिल्ह्यातून आले आहेत. सिंधुदुर्गातून फक्त ९१ अर्ज आले आहेत. त्यापेक्षा अधिक अर्ज नंदुरबार ३३६, गडचिरोली३२७ , हिंगोली ४३० व रत्नागिरी ४६२ आले आहेत.

  मुंबईतूनही आठ हजारांपेक्षा अधिक अर्ज
  आरटीई प्रवेशाला मुंबईतूनही चांगला प्रतिसाद मिळत आहे. १३ दिवसांत तब्बल आठ हजारपेक्षा अधिक पालकांनी अर्ज केले आहेत. मुंबईमध्ये ३५२ शाळांमध्ये ६४६३ जागा आहेत. यामध्ये २९० शाळा एसएससी बोर्डाच्या आहेत. तर ६२ शाळा अन्य बोर्डाच्या आहेत. मुंबईमध्ये प्री प्रायमरी वर्गाच्या ४८२ जागा आहेत. एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये ४१८ तर अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये ६४ जागा आहेत. तर पहिलीच्या वर्गासाठी एसएससी बोर्डाच्या शाळांमध्ये ४८०९ तर अन्य बोर्डाच्या शाळांमध्ये ११७२ अशा ५९८१ जागा आहेत.

  राज्यभरातून आलेले अर्ज
  जिल्हा          अर्ज
  पुणे              ३६७१४
  नागपूर       १६९४६
  ठाणे           ११५३३
  मुंबई         ८४५९
  नाशिक     ८०९७
  औरंगाबाद    ७१३५
  रायगड      ५३२१