स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्रात भिवंडी सातव्या क्रमांकावर

भिवंडी: केंद्र स्तरावर स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत आयोजित स्पर्धेमध्ये भिवंडी शहराने १ ते १० लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सातव्या स्थानी ,राष्ट्रीय स्तरावर २६ वे स्थान पटकाविले आहे अशी माहिती जनसंपर्क अधिकारी मिलिंद पळसुले यांनी दिली आहे .स्वच्छ सर्वेक्षण २०२० अंतर्गत हागणदारीमुक्त शहरांच्या स्पर्धेत ODF++ दर्जा. मिळविला आहे . कचरा मुक्त शहरांच्या मानांकनात थ्री स्टार दर्जा मिळविला. राष्ट्रीय स्तरावर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये १ लाख ते १० लाख लोकसंख्या गटात एकूण ३८२ शहरांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये भिवंडी शहरास राष्ट्रीय स्तरावर २६ वे मानांकन प्राप्त झाले गेल्यावर्षी केंद्र शासनाच्या मानांकनात ८४ वा क्रामांक होता. यावर्षी २६ क्रमांक आहे. तर राज्य स्तरावर स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये १ लाख ते १० लाख लोकसंख्या असणाऱ्या गटात एकूण ३३ शहरांनी सहभाग घेतला होता, त्यामध्ये भिवंडी शहरास राज्य स्तरावर ७ वे मानांकन प्राप्त झाले आहे. गेल्यावर्षी चोविसावा क्रमांक होता.

चांगले मानांकन मिळाल्याबद्दल महापौर प्रतिभा विलास पाटील व आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी हे यश सर्व भिवंडी शहरातील नागरीकांचे असून सर्व नागरिकांच्या सहकार्यामुळे हे यश मिळाल्याची प्रतिक्रिया दिली आहे .या यशात शहरातील नागरीक, महापालिकेचे सर्व अधिकारी कर्मचारी यांचा सिंहाचा वाटा असून सर्वांचे मनःपूर्वक अभिनंदन करीत असल्याची प्रतिक्रिया महापौर प्रतिभा पाटील यांनी देत शहरातील नागरिकांनी आपले घर परिसर स्वच्छ ठेवून शहर आरोग्य मुक्त ठेवण्याचा प्रयत्न करण्याचा संकल्प करूया अशी प्रतिक्रिया दिली आहे .