भिवंडीतील कोरोना रुग्णवाढीचा वेग मंदावला, रुग्ण दुपटीचा कालावधी पोहोचला ७० दिवसांवर

शरद धुमाळ, भिवंडी : महाराष्ट्रात मुंबई पुणे पाठोपाठ सर्वाधिक रुग्ण असलेल्या ठाणे जिल्ह्यातील ठाणे ,कल्याण डोंबिवली ,नवीमुंबई ,मीरा भाईंदर महानगरपालिका क्षेत्रात परिस्थिती आज ही आटोक्यात आली नसताना भिवंडी महानगरपालिका क्षेत्रात कोरोना परिस्थिती आटोक्यात आणण्यात प्रशासनास यश आल्याने सध्या शहरात समाधान व्यक्त केले जात असतानाच ,तालुक्याच्या ग्रामीण भागात आरोग्य सेवा सक्षम नसल्याने शहरा पेक्षा ग्रामीण भागात कोरोना परिस्थिती बिकट आहे .

मार्च महिन्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्या नंतर केंद्र व राज्य सरकारने विविध उपाययोजना करीत आरोग्यसेवा सक्षम करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. त्या सोबत स्थलांतरीत मजुरांची भूक भागविण्यापासून त्यांच्या प्रवासाची व्यवस्था करण्यापर्यंत अनेक सोपस्कर अवलंबिले. मात्र भिवंडी शहर व ग्रामीण भागात उपाययोजना करण्यात एप्रिल महिन्यात प्रशासन अपयशी ठरल्याने जून महिन्यात परीसरात कोरोना रुग्णांच्या संख्येत भरमसाठ वाढ होत असतानाच मृत्यूचे प्रमाणही वाढले .मात्र जुलैमध्ये आयुक्त डॉ पंकज आशिया यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राबविलेल्या उपाययोजनांचा परिणाम जुलै महिन्याच्या शेवटच्या पंधरवड्यात दिसून आला .त्यामुळे आज शहरातील कोव्हिड रुग्णालयात बेड रिकामे असून एकही रुग्ण ऑक्सिजन नसणे अथवा उपचार न होण्याने मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण ही कमी झाले असून शहरातील खाजगी कोव्हिड रुग्णालयांकडून होणारी रुग्णांची पिळवणूक थांबविण्यात प्रशासनाने कंबर कसली असल्याने शहरातील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली आहे .

 ग्रामीण भागात रुग्णांना सुरुवातीपासून रुग्णालय दाखल होण्यापासून उपचार मिळविण्यासाठी येथील रुग्णांना झगडावे लागले. मात्र आजही जिल्हा प्रशासन आरोग्य सुविधा मिळवून देण्यात यशस्वी झाले नसल्याने ग्रामीण भागातील कोरोना परिस्थिती सुधारलेली नाही. येत्या आठवड्यात गणेशपुरी येथील नित्यानंद रुग्णालयात ३०० बेड चे जिल्हा कोरोना हेल्थ सेंटर सुरू होणार असून कोनगाव येथे २०० तर काल्हेर येथे १०० बेड सह सवाद येथे ७०० बेडचे कोव्हिड केअर सेंटर उभारले जाणार असून या व्यवस्था वेळीच केल्या असत्या तर ग्रामीणमध्ये कोरोनामुळे झालेली वाताहत थांबविता आली असती एवढे नक्की .

तीन महिन्यांमधील कोरोना परिस्थितीची आकडेवारी

भिवंडी महानगरपालिका क्षेत्र :-

महिना       एकूण रुग्ण     मृत्यू

मे २०२०      ०१४७        ००७

जून २०२०   १७९४        १०२

जुलै २०२०  १६७७         ०८८
—————————————–
एकूण         ३६१८         १९७

भिवंडी ग्रामीण तालुका क्षेत्र :-

महिना       एकूण रुग्ण     मृत्यू 

मे २०२०      ०१०७        ००३

जून २०२०   ०८५७       ०१३

जुलै २०२०   २०४०        ०७८ 
——————————————
एकूण           ३००४        ०९४

 

या आकडेवारीवरून शहरातील  कोरोना रुग्ण वाढीचा वेग मंदावला असून रुग्ण दुपटीचा कालावधी ७० दिवसांवर पोहचला तर मृत्यु दर ५.४४ % तर ग्रामीण भागात मृत्यू दर ३.१२ % झाला आहे .