भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांचा आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मान

भिवंडी: भिवंडीचे पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे यांचा केंद्र शासनाच्या आंतरिक सुरक्षा पदकाने सन्मान करण्यात आला. स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून ठाणे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त कार्यालयात पदक देऊन त्यांचा सन्मान केला. राजकुमार शिंदे यांनी सन २०१२ ते २०१५ अतिरिक्त पोलीस अधिक्षक गडचिरोली येथे विशेष कामगिरी केली होती. त्यांच्या या कामगिरीची दखल थेट केंद्र शासनाने घेत त्यांना हा पुरस्कार प्रदान केला आहे. सध्या सर्वत्र कोरोना संकट असल्याने आज त्यांचा पोलीस आयुक्तांच्या हस्ते सन्मान करण्यात आला आहे. 

 भिवंडी पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे हे २००५ साली पोलीस खात्यात रुजू झाले असून सुरुवातीला नाशिक येथे पोलीस उपअधीक्षक म्हणून त्यांनी आपल्या पोलीस सेवेतील कार्यास सुरुवात केली आहे. त्यानंतर ठाणे ग्रामीण , नांदेड , पुणे, गडचिरोली, मुंबई अशा विविध ठिकाणी पोलीस सेवा बजावली आहे. सध्या ठाणे शहरांतर्गत असलेल्या भिवंडी परिमंडळ दोनमध्ये ते पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत आहेत. संवेदनशील समजल्या जाणाऱ्या भिवंडी शहरातदेखील आतापर्यंत त्यांनी उत्तम कामगिरी केली असल्याने शहरात शांतता प्रस्थापित आहे. सर्व धर्मातील नागरिकांशी त्यांचे मैत्रीपूर्ण सलोख्याचे संबंध असल्याने सध्या शहरात त्यांची चांगली पकड आहे. 

गडचिरोली येथे सेवेत असताना विविध नक्षलवादी कारवायांमध्ये त्यांनी ३६ नक्षलवादी ठार केले. तर ५० हुन अधिक नक्षलवादी शरण आले होते. त्यांच्या याच कार्याची दखल घेत केंद्र शासनाच्या आंतरिक सुरक्षा पदकाने राजकुमार शिंदे यांचा सन्मान करण्यात आला.