महाडच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कोव्हिड सेंटर सुरु ठेवण्याची भाजपची मागणी

महाड: महाड औद्योगिक वसाहतीमधील एम‌एम‌ए कोव्हीड सेंटर अद्ययावत करा मात्र त्यासोबतच महाड ट्रॉमा केअर सेंटरमधील कोव्हिड सेंटर सुरुच ठेवण्याची मागणी पुन्हा एकदा भाजपाने केली आहे, तर उपचार होऊ न शकल्याने स्थलांतरित केलेल्या अशोक सावंत यांच्या मृत्युला जबाबदार कोण ? असा सवाल भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला. हे सरकार कुचकामी असल्याचा आरोप यावेळी तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांनी केला आहे. 

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठा गजावाजा करत उद्घाटन केलेल्या महाड औद्योगिक वसाहतीमधील एम‌एम‌ए कोव्हीड सेंटरमध्ये एमडी डाॅक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ नसल्याने या कोव्हिड सेंटरचा उपयोग काय ? असा प्रश्न भाजपा तालुकाध्यक्ष जयवंत दळवी यांनी आज विचारला. तसेच भविष्यात या कोव्हिड सेंटरची प्रत्यक्षात पाहणी करण्यासाठी दोन्ही सभागृहातील विरोधी पक्ष नेते उपस्थित राहतील. त्यामुळे अधिकाऱ्यांनी कोणाला खुश करण्यासाठी काम करू नये, असे ठणकावून सांगितले.  यावेळी जिल्हा सरचिटणीस बिपीन महामुणकर, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संदिप ठोंबरे, लोकसभा मिडीया सहसंपर्कप्रमुख महेश शिंदे, उपतालुकाध्यक्ष चंद्रजित पालांडे, युवा संघटनेचे विशाल गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.

महाड औद्योगिक वसाहतीमधील केएसफ काॅलनीत महाड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने सुरु केलेल्या कोव्हिड सेंटरमध्ये डाॅक्टर, नर्स, पॅरामेडीकल स्टाफ नसल्याने उपचाराअभावी रुग्णांचे हाल होत असुन अशोक सावंत यांच्या मृत्यूला जबाबदार कोण असा सवाल बिपीन महामुणकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रातील डाॅक्टरांना सक्तीने या ठिकाणी कार्यरत केल्याने ऐन गौरी गणपती सणांमध्ये ग्रामीण आरोग्य यंत्रणा कोलमडणार आहे. हे कोव्हिड सेंटर शहरापासून लांब असुन जाणे येणेदेखील सोयीचे नाही. औषधांसाठी रुग्णांच्या नातेवाईकांची फरपड होत आहे. तरी पुर्वीचे ट्रॉमा केअर सेंटरमधील कोव्हिड सेंटर सुरु ठेवावे, अशी मागणी भाजपाच्या वतीने करण्यात आली आहे. यासाठी विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्या माध्यमातून या प्रश्नाला वाचा फोडणार असुन, लवकर महाड ग्रामीण रुग्णालयात अद्ययावत कोव्हिड सेंटर उभारु, अशी ग्वाही महामुणकर यांनी दिली आहे.