भाजपने मांडला ‘महावितरणचा काळा चिठ्ठा’

मुंबई: राज्य सरकारच्या मान्यतेने महावितरणने लोकांना जास्त रकमेची वीजबिले पाठवली आहेत. सामान्या माणसाचे पैसे उकळण्याचा प्रकार केला आहे. तसेच महावितरणची आर्थिक गरज भागवण्यासाठी हा घोटाळा केल्याचा आरोप भाजप नेते आणि खासदार किरीट सोमय्या यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये केला आहे. भाजप प्रदेश कार्यालयात घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

यावेळी भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते महावितरणचा घोटाळा दाखविणाऱ्या ‘महावितरणचा काळा चिठ्ठा’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. राज्य सरकार गेल्या काही महिन्यांपासून प्रत्येक विषयामध्ये चालढकल कशी करता येईल हे पाहत असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी यावेळी सांगितले. या पत्रकार परिषदेत भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये, आमदार निरंजन डावखरे, सरचिटणीस श्रीकांत भारतीय आणि आमदार राज पुरोहित हे उपस्थित होते.

 

 किरीट सोमय्या यावेळी म्हणाले की, कोरोना काळात सरासरी वीज बिल देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. फक्त एप्रिल, मे आणि जूनमध्ये सरासरी वीजबिले देण्यात आली. जुलैमध्ये रिडिंगनुसार बिल देणार असे सांगुन दुप्पट, तिप्पट किमतीची बिले वाटली गेली. महावितरणला विद्युत पुरवठा सुरु ठेवण्यासाठी आणि कर्मचाऱ्यांचे पगार देण्यासाठी २० हजार कोटी रुपयांची आवश्यकता होती. त्यासाठी राज्य सरकार काही करायला तयार नव्हती. मात्र सरकारने वाढीव बिलांच्या रुपाने लूट करण्याचा निर्णय घेतला.  साधारणपणे १ लाखपेक्षा जास्त लोकांना ५ हजार युनिटपर्यंत वाढीव रिडींग दाखवून बिले देण्यात आली. अनेकांना जास्त बिल दिल्याचे आणि नंतर सुधारणा केल्याचे महावितरणने मान्य केले आहे. 

राज्य सरकारने जुलैमधील रिडींगला स्थगिती द्यावी आणि जुलैची बिले मागे घ्यावीत, अशी मागणी सोमय्या यांनी केली. तसेच महावितरणने कोरोना काळात २० ते २२ टक्के केलेली दरवाढ मागे घ्यावी, वीजबिल भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, असेही त्यांनी म्हटले. राज्याच्या सर्व भागातून गोळा करण्यात आलेले वाढीव वीजबिलांचे १०० नमुने अर्थात  ‘महावितरणचा काळा चिठ्ठा’  ऊर्जामंत्र्यांना पाठवणार असून राज्यपालांचीही यासंदर्भात भेट घेणार असल्याचे सोमय्या म्हणाले.