वीजबिलांच्या मुद्द्यावर भाजपचे डोंबिवलीमध्ये आंदोलन

डोंबिवली : कोरोना(corona) महामारीच्या काळात भाजपाने(bjp) संयम राखून लोकशाही पद्धतीने वीज बिलाच्या विरोधात आंदोलन केले. मात्र महाराष्ट्रात हा वीज बिलांच्या लूटमारीचा पॅटर्न ठाकरे सरकारने मोठ्या प्रमाणावर राबवला आहे, असा आरोप महाआघाडी सरकारवर करत भाजपने पुन्हा आंदोलन करत  ठाकरे सरकारचा निषेध व्यक्त केला.

डोंबिवली(dombivali) येथील बाजी प्रभू चौकात महावितरणचे कार्यालय आहे. या कार्यालयासमोरील रस्त्यावर  भाजपच्या कल्याण विभागाच्या वतीने आज सकाळी आंदोलन करण्यात आले. आंदोलनाचे नेतृत्व माजी मंत्री आणि स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण यांनी केले. या आंदोलनात डोंबिवलीतील नागरिकांच्या वतीने हजारो पत्रे मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आली.

महावितरण(mahavitran) कंपनीने महाराष्ट्रात वीज ग्राहकांना वीजबिलांचा शॉक देणे आजही चालूच आहे. महावितरण कंपनीने कुठल्यातरी काल्पनिक गृहितकावर आधारित पाच पट, सहा पट वीजबिले ग्राहकांना पाठवली. कोरोना महामारीच्या काळात भाजपाने संयम राखून याबाबत अधिकाऱ्यांना भेटून निवेदने दिले. लोकशाही पद्धतीने आंदोलन केले. हा कल्याण डोंबिवली किंवा कोकणातला असा विषय नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात हा वीज बिलांचा लूटमार पॅटर्न ठाकरे सरकारने राबवला आहे. असा आरोप आ.रवींद्र चव्हाण यांनी केला.

वीज बील वाढीच्या विरोधात प्रत्येक नागरिकांनी  एक पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविण्याचे आवाहन  आ.चव्हाण यांनी केले होते. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात अनेक जण बेरोजगार झाले आहे. एका घराचा हप्ता जितका भरला जातो तितकेच वीज बिल आल्याने नागरिक हवालदिल झाले, याची माहिती आंदोलनावेळी देण्यात आली. भाजपचे कल्याण जिल्हा अध्यक्ष शशिकांत कांबळे, डोंबिवली  ग्रामीण मंडल अध्यक्ष नंदू परब, पूर्व मंडल अध्यक्ष ऩंदू जोशी, पश्चिम  मंडल अध्यक्ष प्रदीप चौधरी, डोंबिवली ग्रामीण महिला मंडल अध्यक्ष मनीषा राणे, सरचिटणीस राजू शेख , भाजपचे नगरसेवक राहुल दामले, मुकुंद पेडणेकर, नगरसेविका खुशबू चौधरी , हरीश जावकर, मोहन नायर ,संजू बिरवाडकर, मिहिर देसाई, पदाधिकारी पप्पू म्हात्रे  तसेच  नागरिक आंदोलनात सहभागी झाले होते.