भाजपा शिक्षक आघाडीकडून नवीन शैक्षणिक धोरणाचे स्वागत

कल्याण :  केंद्र शासनाने नवीन शैक्षणिक धोरणाला मंजुरी दिली असून याचे भाजपा शिक्षक आघाडीने स्वागत केले आहे. मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी याबाबत माहिती देताना सांगितले की, तब्बल ३४ वर्षांनंतर हा बदल करण्यात आला असून देशातील ३४ कोटी विद्यार्थ्यांच्या जीवनावर अमूलाग्र परिणाम करणारे बदल यामध्ये दिसणार आहेत.  

मोदी सरकारने हा शैक्षणिक मसुदा देशातील जनता, शिक्षक, शिक्षणतज्ञ तसेच शिक्षण प्रेमींना खुला करून सूचना मागविण्यात आल्या होत्या. देशभरातील ग्रामपंचायत स्तरापासून ते शाळा, शैक्षणिक संस्था, स्वयंसेवी संस्थांकडून या धोरणाच्या मसुद्यावर चर्चासत्रे, कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या होत्या. भाजपा शिक्षक आघाडी मुंबई-कोकण तसेच नागपूर  विभागाच्यावतीने  चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.  त्यातील अनेक शिफारशी केंद्र शासनाकडे पाठविण्यात आल्या होत्या. 

पाचवीपर्यंत मातृभाषेतून शिक्षण, घोकंपट्टी दूर करून विद्यार्थ्यांचा चहुमुखी विकास, दहावी, बारावीच्या परीक्षा कायम ठेवून ५+३+३+४ अशी नवी रचना, सर्वांना समान संधी, भारतीय जीवनमूल्ये, परंपरा आणि भारतीय भाषांना प्रोत्साहन, शिक्षकांची अशैक्षणिक कामे दूर करणे, पूर्व प्राथमिक शिक्षणाच्या कायद्याच्या चौकटीत आणून अभ्यासक्रमाची निश्चिती, व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन यासह अन्य शिफारशी या धोरणात असून देशाच्या विकासासाठी हे शैक्षणिक धोरण उपयुक्त असल्याचे मुंबई प्रदेश भाजपा शिक्षक आघाडीचे संयोजक अनिल बोरनारे यांनी सांगितले.