डहाणूचा समुद्रकिनारा काळवंडला

डहाणू : डहाणू तालुक्यातील ३३ किलोमीटरच्या समुद्र किनारपट्टीवर उधाणाच्या भरती लाटांसह वाहून आलेला कचरा, डांबर गोळे आणि तेलयुक्त तवंग पसरल्याने किनाऱ्याचा परिसर काळवंडला आहे. त्यामुळे किनाऱ्यालगतची सागरी जैवविविधता आणि पारंपारिक मासेमारी व्यवसायावर परिणाम जाणवतो आहे.

डहाणूतील नितांत सुंदर सागरी किनाऱ्याची पर्यटकांना भुरळ घातली आहे. विकेंडला मोठ्या प्रमाणात पर्यटक दाखल होतात. गणपती विसर्जन काळात स्थानिकांप्रमाणेच परगावातील पर्यटक किनाऱ्यावर मौजमजा करताना दिसतात. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समुद्रावर जाण्यास मनाई आदेश असल्याने पर्यटकांना बंदी आहे. यंदा ऑगस्ट महिन्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नदी-नाल्यांना पूर आला. या प्रवाहासह ठिकठिकाणी साचलेले प्लास्टिक, झाडांचा पालापाचोळा, घरगुती वापरून टाकाऊ झालेल्या वस्तूंचा कचरा समुद्रात वाहून गेला.

उधाणाच्या लाटांसह हा कचरा पुन्हा किनाऱ्यावर आला आहे. सोबत खोल समुद्रातील डांबरीगोळे आणि तेलाचा तवंग पाण्यासह किनारपट्टीवर पसरला आहे. प्लास्टिक, पॉलिथिन आणि पालापाचोळा या कचऱ्यावर तेलकट थर आणि रेतीमुळे ढिगारे होऊन साचला आहे. तर ओल्या वाळूवर काळ्यारंगाचा डांबर पसरून चिंचणी ते बोर्डी ही ३३ किमी लांबीची किनारपट्टी विद्रूप झाली आहे.

नारळी पौर्णिमेनंतर या भागात मासेमारी हंगामाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे होड्यांमध्ये जाळी, बर्फ, पिण्याचे पाणी आणि जीवनावश्यक वस्तू भरणाऱ्या खलाशांना त्याचा त्रास होत आहे. किनाऱ्यालगत पारंपारिक मासेमारी करताना जाळ्यांमध्ये अडकणारे प्लास्टिक, तेलकट पदार्थ चिकटून साहित्याचे नुकसान होत आहे. तर तेलकट तवंगामुळे मासेमारीवर परिणाम झाल्याचे मच्छीमारांचे म्हणणे आहे. शिवाय किनारी भागातील जैवविविधतेवर परिणाम होण्याची भीती व्यक्त होत आहे.