कल्याण डोंबिवलीत डिस्ट्रिब्युटरकडून इंजेक्शनचा काळा बाजार

कल्याण : कोरोना संसर्गामुळे गंभीर झालेल्या रुग्णांना जीवनदान देण्यासाठी वापरण्यात येत असलेल्या Tocilizumab आणि Actemra या इंजेक्शनचा सर्वत्र तुटवडा असताना कल्याणमधील लक्ष्मी डिस्ट्रिब्युटरकडून या इंजेक्शनचा काळा बाजार केला जात असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी केला आहे. इंजेक्शनचा काळा बाजार करत असल्याच्या निषेधार्थ डिस्ट्रिब्युटरच्या दुकानाबाहेर ठिय्या मांडत घोषणाबाजी केली.

कल्याणमध्ये सिपला कंपनीचे लक्ष्मी एन्टरप्राइजेस हे अधिकृत डिस्ट्रिब्युटर आहेत. लक्ष्मी डिस्ट्रिब्युटर हे मेडिकल असोशिएशनचे अध्यक्ष तथा राष्ट्रवादीचे आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांचे आहे. तसेच त्यांचेच अमेय हॉस्पिटल व अमेय फार्मा हे देखील आहे. लक्ष्मी डिस्ट्रिब्युटरमधून अमेय हॉस्पिटल व अमेय फार्मा यांच्यासोबत साटेलोटे करुन या इंजेक्शनची मोठ्या प्रमाणात विक्री केली जात आहे. तसेच इतर हॉस्पिटल व फार्मा यांना नावापुरती विक्री करुन इंजेक्शनचा काळाबाजार करत असल्याचा आरोप राष्ट्र कल्याण पार्टीने केला आहे. एफ.डी.ए. अधिकाऱ्यांना या प्रकरणाबाबत माहिती देऊन लक्ष्मी डिस्ट्रिब्युटर यांच्या इंजेक्शनच्या साठ्याचा सर्व तपास करत सखोल चौकशी करण्याची मागणी राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी यांनी केली आहे.

एकीकडे साताऱ्यामध्ये सत्ताधारी राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी इंजेक्शनचा काळाबाजार झाल्याची शक्यता व्यक्त करत चौकशी करण्याची मागणी केली आहे. दूसरीकडे कल्याणमध्ये त्यांच्याच पक्षाचे आमदार जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांच्या लक्ष्मी डिस्ट्रिब्युटरमधुन इंजेक्शनचा काळाबाजार होत आहे. या प्रकरणाची उच्च स्तरीय  सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी राष्ट्र कल्याण पार्टीतर्फे करण्यात आली आहे.

लक्ष्मी डिस्ट्रिब्युटरच्या बाहेर राष्ट्र कल्याण पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी घोषणा देत निषेध व्यक्त केला. यावेळी राष्ट्र कल्याण पार्टीचे अध्यक्ष शैलेश तिवारी, महासचिव राहुल काटकर, कल्याण जिल्हाध्यक्ष हर्षल साळवी, किरण शेळके, प्रविन के.सी., चंदन सिंह, विवेक सिंह, धनंजय वर्मा, संजय यादव, सूरज सिंह व पदाधिकारी उपस्थित होते.

दरम्यान हे सर्व आरोप खोटे आणि बिनबुडाचे असल्याचा दावा विधान परिषद आमदार आणि लक्ष्मी डिस्ट्रिब्युटरचे जगन्नाथ शिंदे यांनी केला आहे. आमच्या डिस्ट्रिब्युटरला केला जाणारा इंजेक्शन पुरवठा हा कोविड रुग्णालयाला पुरवण्यासाठी दिला जात नसून आमच्या अमेय रुग्णालयाच्या नावे मिळत असल्याचे सांगितले. अमेय रुग्णालय हे देखील इंजेक्शन कंपनीच्या लिस्टवर असून इंजेक्शन पुरवणारी कंपनी ही स्वतः सर्व रुग्णालयांना इंजेक्शनचा पुरवठा करत असल्याचे त्यांनी सांगितले.