ब्लाइंड कार्ड्सच्या वतीने अंतरंग आंतरराष्ट्रीय काव्य महोत्सवाचे आयोजन

कल्याण : ब्लाइंड कार्ड्स एन्टरटेन्मेंटच्या वतीने अंतरंग इंटरनॅशनल पोईट्री फेस्टिवल-२०२० ही आंतरराष्ट्रीय ऑनलाईन कविता स्पर्धा ९ ऑगस्टपासून सुरु झाली आहे.

“पोईट्री फेस्टिवलच्या माध्यमातून लेखकांना आणि कवीजणांना त्यांच्या कलाकृतीसाठी जागतिक स्तराचा मंच उपलब्ध व्हावा. त्यांच्यातील कला,कौशल्य आणि काव्यप्रतिभा जगासमोर यावी तसेच कवींना त्यांच्या पुढील काव्यजीवनासाठी प्रेरणा मिळावी. कवितांच्या माध्यमातून व्यक्त होणाऱ्या कविवर्गाला त्यांच्यातील आक्रोश, त्यांच्या भाव भावना, त्यांचे विचार, त्यांचा समाजाप्रतिचा दृष्टीकोण, प्रेम, निसर्गभाव, मानवी संबंध, मानवता अशा अनेक विविधस्पर्शी विषयांवर विचार व्यक्त करता यावा. जागतिक पातळीवर आपली एक स्व-बाजू मांडण्याची संधी काव्यरूपात उपलब्ध व्हावी”, या उद्देशाने या पोईट्री फेस्टिवलची निर्मिती करण्यात आल्याचे या फेस्टिवलचे आयोजक सुराज कुटे यांनी सांगितले.

सर्वोत्कृष्ट निवडक काव्यकलाकृतींना रोख रक्कम पारितोषिक आणि सर्वच सहभागी कवींना काव्यप्रतिष्ठा प्रेरणा प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. तसेच सर्वौत्तम,सर्वोत्कृष्ट निवडक दहा कविता ब्लाइंड कार्ड्स एंटरटेनमेंट प्रस्तुत अंतरंग मॅगझीन २०२० (डिजिटल) मध्ये प्रकाशित करण्यात येतील. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी वयाचं किंवा विषयाचं बंधन नाही. इंग्रजी, मराठी आणि हिंदी या तिन्ही भाषेतील कविता स्विकारल्या जात आहे. ब्लाइंड कार्ड्स एंटरटेनमेंटच्या इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजवर जगभरातून येणाऱ्या सर्व कविता प्रकाशित केल्या जात आहेत.

सध्यस्थितीत फक्त एकाच आठवड्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर स्पर्धेला चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रतिभावंतांना आपले काव्य सादर करण्यासाठी निर्माण केलेल्या या प्लॅटफॉर्मला भारतातून नव्हे तर जगभरातून भरभरून प्रतिसाद लाभत आहे. महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, पंजाब, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, आसाम, छत्तीसगड, ओडिसा, मेघालय, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, कर्नाटक, अशा संपूर्ण भारतातील विविध राज्यातून काव्यप्रेमींनी स्पर्धेत सहभाग घेतला आहे. आंतरराष्ट्रीय पाताळीवरून फिलिपिन्स, नायजेरिया, आफ्रिका, पाकिस्तान, अशा अनेक देशातून स्पर्धकांनी सहभाग घेतला आहे.