एसटीला भाड्यापोटी मिळणार इतके कोटी, मुंबई पालिका देणार थकबाकी

मुंबईतील बेस्ट(best) परिवहन सेवेच्या मदतीला धावलेल्या एसटी(st) महामंडळाला त्यांची थकीत रक्कम देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा आणखी दिलासा मिळणार आहे.

मुंबई : मुंबईतील बेस्ट(best) परिवहन सेवेच्या मदतीला धावलेल्या एसटी(st) महामंडळाला त्यांची थकीत रक्कम देण्याचा निर्णय मुंबई महापालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या एसटी महामंडळाला थोडा आणखी दिलासा मिळणार आहे. कोरोनामुळे मुंबईतील लोकलसेवा सामान्य प्रवाशांसाठी बंद आहे. त्यामुळे सर्व भार बेस्टवर पडतो आहे. याकाळात बेस्टच्या मदतीसाठी एसटी महामंडळाची लालपरी धावून आली. बेस्टचा बोर्ड लावून मुंबईकरांच्या सेवेसाठी ती धावते आहेे.

महामंडळाला मुंबई महानगरपालिका नियमाप्रमाणे भाडे देणे लागत होती. ते देण्याची तयारी महापालिकेने दाखवली आहे. सर्वसामान्य प्रवाशांसाठी अद्याप मुंबई लोकल सुरू झालेली नाही. त्यामुळे बेस्ट बसेसची संख्या अपुरी पडत आहे. या पार्श्वभूमीवर १ ऑगस्ट २०२० ते ३१ऑगस्ट २०२० या कालावधीत एसटी महामंडळाच्या गाड्या मुंबईत धावत होत्या. या अत्यावश्यक सेवेच्या भाड्यापोटी महानगरपालिका एसटी महामंडळाला कोट्यवधी रुपये देणार आहे.

पाच कोटी देण्याचा निर्णय
या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील आणि शासकीय कर्मचारी वगळता इतर प्रवाशांकडून मिळालेली ८ कोटी ५३ लाख ४६ हजार ९९५ रुपये रक्कम वगळून ५ कोटी ९२ लाख २१ हजार ३४१ रुपये भाड्यापोटी एसटी महामंडळाला देणे बाकी आहे. ही देय असलेली रक्कम मिळावी, अशी विनंती महामंडळाने पालिकेला केली आहे. त्यानुसार पाच कोटीची रक्कम देण्याचा निर्णय पालिकेने घेतला असून तसा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी ठेवला आहे.

यापूर्वी ६ मे ते ३ जुलै या कालावधीतील ९ कोटी ६५ लाख व २१ मे ते २ जुलै या कालावधीतील १६ कोटी ९ लाख १२ हजार ६४२ रुपये असे एकूण ३६ कोटी ४४ लाख रुपये गाड्याच्या भाड्यापोटी पालिकेने महामंडळाला यापूर्वी दिले आहेत. त्यानंतर आता १ ऑगस्ट ते ३१ ऑगस्टपर्यंत अत्यावश्यक सेवा वाहतुकीचे ३२ लाख ८५ हजार ६४४ एवढे अंतर झाले आहे. प्रत्येक किलोमीटरचे ४४ रुपये दराने १४ कोटी ४५ लाख ६८ हजार ३३६ एवढी रक्कम होते.

एसटीने दिल्या होत्या एक हजार गाड्या
८ जूनपासून अत्यावश्यक सेवेसाठी बेस्ट बसेस धावू लागल्या आहेत. मात्र लोकलचे दरवाजे सर्वसामान्य प्रवाशांसाठी बंदच असल्याने प्रवाशांचा भार बेस्ट बसेसवर आहे. बेस्ट बसेसमध्ये होणारी गर्दी लक्षात घेऊन बेस्ट उपक्रमाने एसटी महामंडळाच्या एक हजार गाड्या भाडेतत्त्वावर घेतल्या. गाड्यांच्या भाड्याचे पैसे मुंबई महापालिकेने देण्याचा निर्णय घेतला आहे.