वांगणी येथील बीएसएनएलचा टॉवर अनेक महिन्यांपासून बंद

म्हसळा :  म्हसळा तालुक्यातील मौजे वांगणी येथील बीएसएनएलचा टॉवर गेल्या अनेक महिन्यांपासून बंद आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांचा दैनंदिन संपर्क तुटला असून अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तीन जूनला निसर्ग चक्री वादळ झाले होते. या वादळात रस्त्यालगत असलेली झाडे पडली असल्याने येथे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

या टॉवरच्या रेंजमध्ये खामगाव, सोनघर, कासार मलई, शिर्के ताम्हाणे, गवळवाडी, लेप, कणघर, वांगणी, देहेन, मोरवणे, पाष्टी, मांदाटणे, कुडगाव अशी अनेक गावे आहेत. या गावातील नागरिकांचा टॉवर बंद असल्याने संपर्क तुटला आहे. टॉवर चालू करण्यासाठी संबंधित अधिकारी वर्गाला वारंवार याबाबत विनंती करूनही याकडे दुर्लक्ष केले जात आहे. या भागातील नागरिकांच्या अडचणी समजून घेऊन बीएसएनएलचा टॉवर दोन्हीही विभागाच्या अधिकाऱ्यांनी समन्वय साधून लवकरात लवकर वांगणी येथील टॉवर सुरू करावा, अशी मागणी कणघर ग्रामपंचायतीचे सरपंच श्रीपत धोकटे यांनी लेखी पत्राद्वारे केली आहे. या टॉवरसोबतच खामगाव येथीलसुद्धा बीएसएनएलचा टॉवर सुरू करावा, अशी मागणी परिसरातील नागरिक करीत आहेत.

महावितरण विभागाने रस्त्यावर पडलेली झाडे तोडून द्यायला पाहिजे असे बीएसएनएलचे अधिकारी सांगत आहेत. तर महावितरणचे अधिकारी हे काम बीएसएनएल विभागाचा आहे असे कारण पुढे करीत असून टॉवर ची सेवा पूर्ववत सुरू करण्यास टाळाटाळ करीत आहेत. या सर्व परिस्थितीमध्ये वांगणी येथील बीएसएनएलच्या टॉवरला कोणी वाली आहे की नाही ? असा प्रश्न निर्माण झाला आहे.

वांगणी येथील टॉवरच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात झाडे पडली असल्याने पुढील मार्ग बंद आहे. येत्या आठ दिवसांत पडलेली झाडे बाजूला करून बीएसएनएल टॉवरची सेवा पूर्ववत केली जाईल. टॉवर बंद असल्याने या भागात उद्भवणाऱ्या समस्यांबाबत आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिलेली आहे.
                                                                                              – अकतार खान, जे.ई.बीएसएनएल म्हसळा विभाग