महाडमधील काजळपुरा भागातील बिल्डिंग कोसळली, मदतकार्य सुरु

महाड: आज संध्याकाळी महाड शहरातील काजळपूरा खारखांड मोहल्ला येथील एक दोन विंगची पाच मजली इमारत पत्यासारखी कोसळून शंभरवर रहिवासी ढीगाऱ्याखाली अडकले असल्याची भिती व्यक्त होत आहे. बचाव कार्यास सुरुवात झाली असून अंधार आणि पावसाचा व्यत्यय बचाव कार्यात येत आहे.दरम्यान या घटनेची माहिती समजताच सर्व तऱ्हेची आपदकालीन यंत्रणा नगरपालिका, एमआयडीसी – महाड, रोहा, चिपळूण आदी ठिकाणाहून पोहचत आहेत.

या घटनेची सविस्तर माहिती अशी की शहरातील काजळपूरा खारकांड मोहल्ला या मुस्लीम वस्तीमध्ये तारीक गार्डन नावाची दोन विंगची किमान पाच मजल्याची ४० ते ५० कुटूंबीय २०० ते २५० रहिवासी या इमारतीमध्ये राहात आहेत. आज संध्याकाळी ६. १५ वाजणेचे दरम्यान तारीक गार्डन ही इमारत पत्यासारखी जमिनीवर कोसळून हा अपघात झाला.

या घटनेची माहिती समजताच महाड नगर परिषद, एमआयडीसी, महाड, रोहा, चिपळूण येथून अग्नीशमनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झालेत.  जेसीबी आदीच्या सहाय्याने मदत कार्यास सुरुवात केली आहे. तर इमारतीचा एक भाग मोकळा असून उर्वरित भागात मदत कार्य करणे जिकिरिचे झाले आहे. रात्रीची अंधाराची वेळ असल्याने इमारतीच्या पडलेल्या ढिगाऱ्याखाली नक्की किती रहिवासी अडकले आहेत सांगणे कठीण झाले आहे.

पाच वर्षांपूर्वी तळोजा येथील पटेल आणि युनूस शेख या बिल्डर्सनी या पाच मजली इमारतीचे बांधकाम केले आहे. या इमारतीमध्ये सुमारे पंचेचाळीस ते पन्नास फ्लॅट असल्याचे सांगण्यात येत आहे. गेल्या काही महिन्यांपासून ही इमारत हलत असल्याची तक्रार या इमारतीमधील रहविाशांनी या बिल्डरकडे केली होती. मात्र या तक्रारींकडे त्यांनी दुर्लक्ष केले.

बिल्डरवर गुन्हा दाखल करण्याची मागणी
ही इमारत हलत असल्याची तक्रार करूनदेखील त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या बिल्डर्सवर त्वरीत गुन्हा दाखल करण्याची मागणी या घटनेनंतर केली जात आहे. आज सांयकाळी या इमारती मधून काही हलण्याच आवाज येवू लागताच ४० कुटुंबापैकी २५ कुटूंबियांना बाहेर पडण्यात यश आले आहे. तर पंधरा कुटुंबीय या कोसळलेल्या इमारतीच्या ढीगाऱ्याखाली अडकल्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे. या दुर्घटनेची तीव्रता लक्षात घेता मदत कार्यासाठी एनडीआरएफ सारख्या दलांची तर त्या बरोबर तज्ञांचीही गरज भासणार आहे तरच जिवतं असणाऱ्यांचे प्राण यामध्ये वाचू शकतात. या अपघाताची माहिती समजताच राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाची तीन पथके पुणेहुन तात्काळ महाडला मदतकार्यात भाग घेण्यासाठी रवाना झाली आहेत. पोलीस आणि शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहचली असून बचावकार्य युद्ध पातळीवर सुरु आहे.

या घटनेची माहिती मिळाल्यानंतर महाडचे आमदार भरत गोगावले, माजी आमदार माणिक जगताप, नगराध्यक्ष स्नेहल जगताप, यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. रायगडच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांनी देखील प्रशासनाशी संपर्क साधून या दुर्घटनेची माहिती घेतली.

ही दुर्घटना कितीही दुर्दैवी असली तरी घटनास्थळ ते संपूर्ण परिसरात किमान पाच ते सात हजारांवर बघ्यांची गर्दी उसळली आहे. महाड शहर तालुक्यात सध्या कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि मृतांचा आकडा पाहता ही गर्दीच जणू कोरोनाला निमंत्रण देण्याचा धोकाही या अपघाताबरोबर वाढला आहे.