बिल्डर धार्जिणं ग्रोथ सेंटर रद्द करा

३० एप्रिल २०१६ रोजीच्या अधीसूचनेद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १७ गावांमध्ये कडोंमपा व उर्वरीत १० गावातील क्षेत्रासाठी एमएमआरडीए प्राधिकरण कायम ठेवून १०८९ हेक्टर क्षेत्रासाठी "कल्याण ग्रोथ सेंटर" लादण्यात आले आहे.

कल्याण : ३० एप्रिल २०१६ रोजीच्या अधीसूचनेद्वारे कल्याण-डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील २७ गावांपैकी १७ गावांमध्ये कडोंमपा व उर्वरीत १० गावातील क्षेत्रासाठी एमएमआरडीए प्राधिकरण कायम ठेवून १०८९ हेक्टर क्षेत्रासाठी “कल्याण ग्रोथ सेंटर” लादण्यात आले आहे. हे ग्रोथ सेंटर बिल्डर धार्जिणं असून ते रद्द करण्याची मागणी आगरी कोळी भूमिपुत्र महासंघाशी सलग्न असलेल्या सर्व पक्षिय युवा मोर्चाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

हे ग्रोथ सेंटर लादण्यापूर्वी हरकती सूचना न मागवता ग्रोथ सेंटरविषयी हालचाली सुरू झाल्या असता युवा मोर्चा संघटनेमार्फत अधिसूचित १० गावांमध्ये गावबैठका घेऊन हे प्रकल्प अंमलात येण्यापूर्वी ग्रामस्थांनी काही मागण्या उपस्थितीत केल्या. याच मागण्यांचे निवेदन संघटनेमार्फत तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिनांक १० एप्रिल २०१८ रोजी देण्यात आले.

या निवेदनाच्या अनुषंगाने लगेच दहा दिवसांनी  दिनांक २० एप्रिल २०१८ रोजी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे तत्कालीन मुख्यमंत्र्याच्या अध्यक्षतेखाली बैठक संपन्न झाली. या बैठकीत युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांसह संबंधित क्षेत्रातील नगरसेवक, पालकमंत्र्यांसह स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते. या बैठकीत मुख्यमंत्री महोदयांनी गावकऱ्यांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार केला जाईल असे आश्वासन दिले होते.

ग्रामस्थांच्या मागण्या मान्य नसताना एमएमआरडीए प्राधिकरणामार्फत चोरून ड्रोन सर्वेक्षण करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. त्यातच याच ग्रोथ सेंटर क्षेत्रात धनदांगड्या बिल्डरांना बांधकाम परवानगी दिली जाते आणि येथील स्थानिक भूमिपुत्रांना प्रस्तावित ग्रोथ सेंटरचे कारण देत ही परवानगी नाकारली जाते.

एकाच क्षेत्रासाठी नगरपरिषद, महानगरपालिका आणि एमएमआरडीए प्राधिकरणामुळे स्थानिकांमध्ये संभ्रमाचे वातावण पसरल्यामुळे या क्षेत्रामधून एमएमआरडीए प्राधिकरण हटल्यास स्थानिक भूमिपुत्रांच्या विकासाला चालना मिळू शकेल त्यामुळे हे बिल्डर धार्जिणं ग्रोथ सेंटर या भागातून वगळावे यासाठी युवा मोर्चा मार्फत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यसह संबंधित विभागांना ई-मेल व स्पीड पोस्ट द्वारे निवेदन देण्यात आले असल्याची माहिती सर्व पक्षीय युवा मोर्चाचे गजाजन पाटील यांनी दिली.