पेण – बोरगाव रस्त्याच्या खराब अवस्थेमुळे नागरिकांचे हाल

पेण: मुख्यमंत्री ग्रामसडक योजने अंतर्गत पेण(pen) तालुक्यातील पेण शहराला बोरगाव, कासमाळ व ईरानी या आदिवासी वाड्यांना जोडणाऱ्या ६.१२० किमी अंतर असणाऱ्या रस्त्याचा शुभारंभ फेब्रुवारी २०१६ रोजी रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश मेहता आणि राज्यमंत्री रविंद्र चव्हाण याच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडला. या कामाचा सुमारे २ कोटी १० लाखांचा ठेका पुणे येथील के. टी. कन्स्ट्रक्शन या कंपनीला दिला होता. मात्र सन २०१७ साली हा रस्ता अवघ्या सहा महिन्यांमध्ये खचला होता. प्रसार माध्यमांमध्ये संबंधित बातम्या आल्यावर प्रशासन जागे झाले आणि रस्ता दुरुस्ती करुन काम पूर्णत्वास नेण्यात आले. या रस्त्याचे काम हे निकृष्ठ दर्जाचे असल्याने प्रत्येक वर्षी पावसाळ्यात या रस्त्यावर खड्डे आणि चिखलाचे साम्राज्याचे जाळे तयार झालेले असते. तसे यावर्षीसुद्धा झाले आहे. हा रस्ता पावसात खचून, सर्वत्र खड्डे पडले आहेत. या रस्त्याच्या कामासाठी योग्य प्रकारची खडी, रेती, वाळू व डांबर न वापरल्याने व रस्त्यावर योग्य प्रकारे डांबराचा मुलामा न दिल्याने सर्व मिश्रण वरती येऊन जागोजागी खड्डे पडले आहेत. एक वर्षात काम पूर्ण करुन पुढील पाच वर्षे त्याची देखभाल व  डागडुजी करायाची असा करार झाला असतानासुद्धा या रस्त्याचे काम झाल्यापासून एकदाही ठेकेदारामार्फत या रस्त्याकडे ढुंकूनही पाहिले गेेले नसल्याने या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे.

उन्हाळ्याचे चार महीने गेले तरी या रस्त्याची डागडुजी केली नाही. त्यामुळे ऐन पावसाळ्यात येथील स्थानिकांना ये जा करताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पेणपासून ५ किलोमीटरवर असलेले कासमाळ हे पर्यटकांचे आवडते स्थळ  आहे. त्यामुळे रोज शेकडो नागरिक फेरफटका मारन्यासाठी या ठिकाणी येत असतात. या रस्त्यावर चिखलाचे साम्राज्य पसरल्याने वाहन चालवणे जिकिरीचे झाले आहे. तसेच आदिवासी वाड्यांमध्ये राहणारे आदिवासी बांधव दूध आणि भाज्या विक्रीसाठी याच रस्त्याने खड्ड्यांच्या अडचणींचा सामना करुन रोज येतात. या रस्त्याच्या साईडपट्टीला आणि लहान पुलांना अद्यापही कठडा न लावल्याने वाहनांचा मोठा अपघात होण्याची दाट शक्यता आहे. येथील स्थानिक नागरिक ठेकेदारांवर चौकशी करुन कारवाईची मागणी करत आहेत.