कल्याणमध्ये कोरोनारुपी नारळ दर्याला अर्पण

कल्याण : कोरोना महामारीचे सावट सर्वच सणांवर पडले असून आज झालेल्या नारळी पौर्णिमेवर देखील याचे सावट पाहायला मिळाले. या संकटातून लवकर बाहेर पडता यावे यासाठी कल्याणमधील कोळी बांधवांनी कोरोनारुपी नारळ दर्याला अर्पण करत सर्वजण कोरोनामुक्त व्हावेत, यासाठी प्रार्थना केली.

कोळी समाजाचा पारंपारिक सण म्हणजे नारळी पौर्णिमा. दरवर्षी यानिमित्त कल्याण शहरात वाजत गाजत मोठी मिरवणूक काढली जाते.  मात्र यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नारळी पौर्णिमेनिमित्त मोठी मिरवणूक न काढता कल्याणमधील गणेश खाडी किनारी कोळी समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते देवानंद भोईर यांनी त्यांच्या निवडक कोळी बांधवांसह जात दर्याची पूजा अर्चा केली. संपूर्ण जगासह देश आणि आपल्या राज्यावरील कोरोनाचे संकट दूर व्हावे ही प्रार्थना दर्याला केली असून त्यासाठी कोरोनारुपी नारळ दर्याला अर्पण केला असल्याची माहिती देवानंद भोईर यांनी दिली.