काँग्रेसने थेट फेसबुकचा CEO मार्क झकरबर्गला पत्र लिहीत केली ‘ही’ मागणी

काँग्रेसने सध्या सत्ताधारी भाजपाला फेसबुकमुळे चांगलेच धारेवर धरले आहे. समाजमाध्यमातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले फेसबुक भाजपाला झुकते माप देतो आणि भारतातील फेसबुक हे भाजप आणि राष्ट्रीय सेवा संघाच्या कंट्रोलमध्ये असल्याचे काँग्रेसचे म्हणणे आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसने मंगळवारी थेट फेसबुकचे सीईओ मार्क झकरबर्ग यांना पत्र लिहिले आहे. या पत्राच्या माध्यमातून काँग्रेसने ‘द वॉल स्ट्रीट जर्नल’मधील वृत्तांकनाचा दाखला देत  फेसबुकचे भारतातील संचालन आणि भारतातील लीडरशीप टीमची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी केली आहे. 

हे पत्र  काँग्रेसचे सरचिटणीस के.सी.वेणूगोपाल यांनी पाठवले आहे. या पत्रात केलेल्या आरोपांची चौकशी एक-दोन महिन्यात पूर्ण करुन त्याचा अहवाल फेसबुकच्या बोर्डाला पाठवावा तसेच अहवाल सार्वजनिक करावा, असे वेणूगोपाल यांनी पत्रात म्हटले आहे.

 

काय आहे पत्रात ?

“द वॉल स्ट्रीट जर्नल ‘मधील लेखामध्ये फेसबुक इंडियाच्या नेतृत्वावर स्पष्टपणे एका राजकीय पक्षाची बाजू घेतल्याचा आरोप करण्यात आला असून भारताच्या निवडणूक लोकशाही प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याचा हा गंभीर आरोप करण्यात आला आहे. याबाबत वॉल स्ट्रीट जर्नलने चौकशी केल्यानंतर फेसबुक इंडियाकडून तेढ निर्माण करणाऱ्या पोस्ट डिलीट करण्यात आल्याचे समजते, हे खरे असेल तर गुन्हा केल्याची ही स्पष्ट कबुली आहे” असे पत्रात म्हटले आहे.