मुंबईत कोरोना संसर्गाचे प्रमाण २ टक्क्यांनी वाढले -फडणवीसांचे मुख्यमंत्र्यांना चाचण्या वाढविण्यासाठी पुन्हा पत्र

कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करीत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील ९२ हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता ७५ हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे.

पाटणा: कोरोना नियंत्रणात आणायचा असेल तर चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करा, असा सातत्याने आग्रह करीत असताना प्रत्यक्षात मात्र राज्यातील ९२ हजार प्रतिदिन चाचण्यांचे प्रमाण आता ७५ हजार चाचण्या प्रतिदिन असे झाले आहे. मुंबईतसुद्धा संसर्गाचे प्रमाण हे २ टक्क्यांनी वाढले आहे.(corona in mumbai increased by 2 percent) त्यामुळे चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करण्यासंदर्भात आणखी एक पत्र माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे(devendra fadanvis letter to  chief minister) यांना पाठविले आहे.

या पत्रात देवेंद्र फडणवीस म्हणतात की, राज्यातील चाचण्यांची क्षमता दीड लाखांपर्यंत नेण्याचा मनोदय खुद्द मा. पंतप्रधान महोदयांच्या व्हीडिओ कॉन्फरन्स बैठकीत मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला होता. प्रत्यक्षात मात्र चाचण्यांच्या संख्येत सातत्याने घट केली जात आहे. यामुळे कदाचित रूग्णसंख्या कमी दाखविणे शक्य होईल. पण, कोरोना नियंत्रणात आणता येणार नाही आणि याचा फटका अर्थव्यवस्था खुली करण्याला बसेल.१ ते १५ सप्टेंबर या पंधरवाड्यात १२,७०,१३१ चाचण्या महाराष्ट्रात करण्यात आल्या. याची सरासरी ८४,६७५ चाचण्या प्रतिदिन इतकी येते. १६ ते ३० सप्टेंबर या काळात महाराष्ट्रात १३,७६,१४५ चाचण्या करण्यात आल्या, याची सरासरी ९१,७४३ चाचण्या प्रतिदिन इतकी येते. मात्र १ ते १५ ऑक्टोबर या काळात केवळ ११,२९,४४६ इतक्या चाचण्या करण्यात आल्या, याची सरासरी ७५,२९६ चाचण्या प्रतिदिन इतकी येते. यामुळे चाचण्यांची संख्या लक्षणीयरित्या कमी करण्यात आल्याचे स्पष्ट होत आहे.

मुंबईतसुद्धा पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या सातत्याने वाढत असतानाही चाचण्यांकडे हवे तसे लक्ष दिले जात नाही. मुंबईत १ते १५सप्टेंबर या पंधरवाड्यात १,७४,१३८ चाचण्या करण्यात आल्या, त्यातून २७,७९१ रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर हा १५.९५ टक्के इतका होता.१६ ते ३० सप्टेंबर या काळात १,७९,७५७ चाचण्या करण्यात आल्या आणि त्यातून ३१,६७२ रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर १७.६१ टक्क्यांवर पोहोचला. १ ते १५ ऑक्टोबर या पंधरवाड्यात १,८०,८४८ चाचण्यांमधून पुन्हा ३१,४५३ रूग्ण आढळून आले. संसर्गाचा दर १७.३९ टक्के इतका होता. याचाच अर्थ मुंबईतील संसर्गाचा दर सातत्याने वाढतो आहे. १ ते १५ सप्टेंबर या काळात मुंबईत ५७२ मृत्यू नोंदविण्यात आले, ते १६ ते ३० सप्टेंबर या काळात ६९९ झाले आणि १ ते १५ ऑक्टोबर या काळात ६७२ इतके होते . याचाच अर्थ मृत्यूच्या संख्येत सुद्धा वाढ झाली. जवळजवळ २ टक्क्यांनी मुंबईतील संसर्गाचे प्रमाण वाढूनही चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करायला सरकार का तयार नाही, हा मोठाच प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे.

राष्ट्रीय पातळीवर सुद्धा पाहिले तरी महाराष्ट्रातील लोकांचे मृत्यूचे प्रमाण अतिशय गंभीर आहे. देशात प्रतिदशलक्ष ९७.६ मृत्यू असले तरी महाराष्ट्रात हेच प्रमाण ३३३ मृत्यू प्रतिदशलक्ष इतके आहे. राष्ट्रीय सरासरीपेक्षा जवळजवळ ४ पट आहे. महाराष्ट्रातील लोकसंख्येचे देशातील लोकसंख्येत प्रमाण हे ९ टक्के आहे. पण, देशातील एकूण कोरोनाबळीत महाराष्ट्राचे प्रमाण हे ४१ टक्के आहे. भारतातील कोरोना रूग्णांच्या प्रमाणात महाराष्ट्रातील रूग्णांचे प्रमाण हे २२ टक्के आहे. असे असले तरी राष्ट्रीय पातळीवर होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत मात्र महाराष्ट्र सातत्याने मागे आहे. महाराष्ट्रात, मुंबईत परिस्थिती लवकर पूर्वपदावर आणायची असेल , तर चाचण्यांवर भर द्यावा लागेल. कोरोना प्रादुर्भाव सातत्याने वाढत असल्याने अर्थव्यवस्था खुली करण्यात अनेक समस्या येत आहेत. समाजातील प्रत्येक घटक आता प्रचंड आर्थिक अडचणीत असताना आता तरी चाचण्यांवर लक्ष केंद्रीत करावे, अशी विनंती देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.