कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांनी ओलांडला २९ हजारांचा टप्पा

कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना(corona) रुग्णांनी २९ हजारांचा टप्पा ओलांडला असून आज नव्या ३७८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १० जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४२६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या ३७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या २९,०१५ झाली आहे. यामध्ये ३१३४ रुग्ण उपचार घेत असून २५,२५१ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यंत ६३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

आजच्या ३७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व – ५५, कल्याण पश्चिम- ९२, डोंबिवली पूर्व १२१, डोंबिवली पश्चिम- ८३, मांडा टिटवाळा – ८, मोहना – ३, तर पिसवली येथील १६ रुग्णांचा समावेश आहे. डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ७७ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज क्रीडा संकुलमधून, १४ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय, ६ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशनमधून बरे झालेले आहेत.